Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
एक ध्यास विवंचनेचा! - प्राचार्य शिवाजीराव भोसले (भाग १)
GlobalMarathi
Thursday, July 01, 2010 AT 12:00 AM (IST)
स्वामी विवेकानंद हा एक विचार होता, आचार होता, उच्चार होता. त्यांच्या जीवनाला ज्ञानाची व ध्यानाची बैठक होती. धर्म आणि ग्रंथ यांच्या आधाराने या सर्वापलीकडे असणारे जीवनाचे विराट आणि उदात्त रूप आपण शोधावे व मानवकुलाचा प्रवास त्या दिशेने घडावा अशी अपेक्षा आणि आकांक्षा बाळगून पावले टाकणारे एक कर्मयोगी, भक्तियोगी, ज्ञानयोगी म्हणजे विवेकानंद!

लौकिक अर्थाने स्वामीजी केवळ एक पदवीधर होते. कलकत्ता विद्यापीठाचे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले ते त्या काळचे एक विद्याथीर् होते. पुढे ते व्यासंगपुरुष म्हणून मान्यता पावले. त्यांचे आगळेपण असे की, त्यांना एक पुस्तक कधीही दोनदा वाचावे लागले नाही. ब्रिटानिकाचा ज्ञानकोश त्यांच्याही काळी होता. त्याचे दहा खंड त्यांनी सहज स्मृतिगत केले होते. गणित, शास्त्र, साहित्य अशा सर्व शाखांत त्यांच्या विचारांची गती विलक्षण होती.

' जीवन' हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. जगात देव आहे का? तो कोणी पाहिला आहे का? मला तो कोणी दाखवू शकेल का? पुस्तकी पांडित्यापलीकडचा परतत्य स्पर्श कोणी अनुभवला आहे का? ही प्रश्नावली समोर ठेवून त्यांनी दशदिशांचा धांडोळा घेतला. कोडे माझे कुणी उकलील का? असे साकडे ते सर्वांना घालत. जीवनाचा बोध घडावा म्हणून त्यांनी विरक्ताचे उपाधीमुक्त जीवन स्वीकारले. त्यांचे वडील आणि आजोबा कायदेपंडित होते. स्वामींना तेवढी मजल मारून कलकत्याला हायकोर्टात उभे राहता आले असते. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, असामान्य वक्तृत्व, लोकविलक्षण भाषाप्रभुत्व अशी गुणसंपदा लाभलेला हा युवक अनेकांच्या नजरेत भरला. एक 'स्थळ' म्हणून त्यांच्याकडे पाहणारा धनिक पित्यांचा एक वर्ग तेव्हा कलकत्त्यात होता.

पण विवेकानंदांच्या नजरेपुढे एकच स्थळ होते. त्याचे नाव जीवन! या जीवनाचा कोणी निर्माता आहे का? तो असेल तर त्याचे दर्शन घडेल का? ज्याने देव पाहिला असा कोणी देवमाणूस जगात असेल का? पण माणसाने मुद्दाम पहावा असा देव तरी या जगात असेल का? घराघरात देव्हारा असतो; पण देव कोठेच नसतो. तरी पूजापाठ चालूच राहतात. यालाच जगरहाटी म्हणतात. हे असेच चालणार का? याचि देही, याचि डोळा मला हे जाणावयाचे आहे; पण माझ्याही अगोदर ज्यांनी हे पाहिले, अनुभवले असे कोणी महाभाग भेटतील काय? ही स्वामींची विवंचना होती.

अनेक समकालीनांना, थोरामोठ्यांना हा नरेंदनाथ विश्वनाथ दत्त नावाचा युवक भेटत होता. त्यांच्याशी संवाद, संभाषण करीत होता. देवेंदनाथ टागोर, केशवचंद सेन अशा समकालीन सत्पुरुषांना, विचारवंतांना तो भेटत होता.

या युवकाची ही जिज्ञासा अनेकांना एक प्रकारची व्यवहारशून्यता वाटत होती. या मुलाचे ज्यांना कौतुक वाटे, ते एवढेच म्हणत : 'या प्रश्नांना निर्णायक उत्तरे नाहीत. उगाच वेळ वाया घालवू नकोस.'

विवेकानंद आग्रही होते, निश्चयी होते. 'याचि देही, याचि डोळा' त्यांना हे जाणून घ्यावयाचे होते. त्यांच्या जीवनप्रश्नावलीत  महत्त्वाचा प्रश्न  होता : देव आहे का? तो असेल तर कोणी तो प्रत्यक्ष पाहिला आहे का? मला तो दिसेल का? निदान कोणी तो दाखवू शकेल का? देवाचा धावा करणारे अनेकजण असतात; पण ते संभ्रमाच्या आवर्तात सापडतात. शेवटी तुकारामासारखा संतही म्हणतो : 'मज हा संदेह झाला दोही सवा। भजन करू देवा अथवा नको' विचारी मनावर येणारे अभ्र कसेही असले तरी त्यामुळे आसमंत अंधारून येते. आत्म्याची काळोखी रात्र ती हीच! विवेकानंदांच्या वाट्याला ती आली होती. या रात्रीच्या काळोखातून प्रकाशाच्या दिशेने हा साधक पावले टाकत होता. त्याची प्रार्थना होती : ''तमसो मा ज्योतिर्गमय।''

सुखासुखी ओढवून घेतलेले हे दु:ख होते. त्यात दुदैर्वाचा भाग नव्हता. आपल्याच स्वभावगुणांचा तो परिणाम होता. ज्या वयात मुलांनी खावे, प्यावे, ल्यावे, नाचावे, बागडावे, गमतीजमती कराव्या त्या वयात असे कशाचे तरी डोहाळे लागावे हा एक विनोद होता.

' शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ यांच्या मनाला लागणारी विवंचना हा त्यांच्या मोठेपणाला फुटलेला पाझर असतो. सुमार माणसे सुखी असतात. खुळे लोक खळखळून हसतात.

ऐहिक सुखाची तृष्णा नसणे, अधिक विचारापायी मानसिक यातना अनुभवणे व या यातनांच्या शरपंजरी पडून एखाद्या ध्यासापायी श्वास सोडणे हा ज्यांच्या पत्रिकेतील योग असतो तेच पुढे ज्ञानयोगी ठरतात. त्यांच्या साधनेच्या प्रकाशात जनसामान्यांची पावले जीवन मार्गावरून पडत राहतात.

- प्राचार्य शिवाजीराव भोसले


प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची 'स्वामी विवेकानंद' ही लेखमाला आपल्या मित्रमंडळींना पाठवून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करावे ही नम्र विनंती. प्रतिक्रिया
 
On 12/08/2013 09:15 PM Abhijit said:
मला वाटते स्वामी विवेकानंद हे येशु चे च दुसरे रूप होते.

 
On 17/07/2013 08:40 PM guddi said:
मला हे आवडले आहें खूपचं छान आहें

 
On 04/12/2012 02:57 AM Prashant Bhame said:
स्वामी विवेकानंद = जीवन

 
On 19/11/2012 02:03 AM arvind2_bagale@live.com said:
अतिशय उत्तम लेख, माझ्या लहानपणी मी स्वामी विवेकानंद या विषयावरची प्रा. शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने ऐकली आहेत. फारच सुलभ रीतीने ते हा तसेच स्वामी रामदास हाही विषय विषद करीत असत.असेच उत्तमोत्तम वाचावयास मिळावे अशी प्रार्थना.

 
On 02/11/2012 09:50 PM jaywant suryavanshi said:
pracharyanchya smrutis abhivadan

 
On 07/04/2012 04:30 PM sandeep s rajgru said:
very nice

 
On 12/05/2011 08:05 PM Mahesh J Sawant said:
"शेवटी तुकारामासारखा संतही म्हणतो : 'मज हा संदेह झाला दोही सवा। भजन करू देवा अथवा नको' " हे वाक्य योग्य वाटत नाही कारण संत तुकाराम महाराजांनी जन्म केवळ आणि केवळ भक्ती साठी च घेतला- तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हांसी न लागे धन संपदा संत संग देई सदा.

 
On 18/03/2011 12:32 PM Rameshkumar Laxman Sonawane said:
मी सरांचे दोन वेळेस भाषण ऐकले आहे,खूप आनंद झाला,ज्ञान मिळाले ,सरांना माझा लाख लाख प्रणाम .

 
On 16-01-2011 10:00 AM vijay bhate said:
अतिशय उत्तम लेख, माझ्या लहानपणी मी स्वामी विवेकानंद या विषयावरची प्रा. शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने ऐकली आहेत. फारच सुलभ रीतीने ते हा तसेच स्वामी रामदास हाही विषय विषद करीत असत.असेच उत्तमोत्तम वाचावयास मिळावे अशी प्रार्थना.

 
On 05/01/2011 03:14 PM anjali said:
विवेकानंद

 
On 24/11/2010 03:34 PM gondu patil said:
very good thought