Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
प्रा. शिवाजीराव भोसले यांनी लिहलेला लेख
-
Tuesday, June 29, 2010 AT 12:00 AM (IST)
(आज शिवाजीराव भोसले नाहीत. पण त्यांची अपार ज्ञानसंपदा विखुरली गेली आहे. अनेक विषयांतले त्यांचे विचार ऐकणे ही बुध्दीला आणि मनाला प्रेरणा देणारी असे. त्यातलाच हा एक लेख)

एखाद्या महापुरुषाची मते अमान्य होऊ शकतात; पण त्याची महत्ता अमान्य करता येत नाही. त्याचे उत्तुंग व्यक्तिमत्व, निरभ्र चारित्र्य, संघटनाकौशल्य, अव्यभिचारी राष्ट्रनिष्ठा ही दौलत नाकारता येत नाही. त्याचे जीवन हा अनेक जीवनमूल्यांचा मानदंड असतो. डॉ. हेडगेवार यांच्यानंतर संघ परिवाराचे सारथ्य करणारे गोळवलकर गुरुजी यांचे व्यक्तिमत्व अनेकांना स्फूर्तिप्रद, मार्गदर्शक आणि वंदनीय वाटते, ही वस्तुस्थिती आहे. हजारो युवकांच्या मनात वास करणारे हे व्यक्तिमत्व एक विभूतिमत्व होते.

आपल्या ३३ वर्षांच्या राष्ट्रसेवा कार्यात गुरुजींनी कामाचे डोंगर उभे केले. हजारो मैलांचा प्रवास केला. दिवस-रात्र या प्रहरातील फरक पुसून टाकला. त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेली पत्रे पस्तीस हजाराहून अधिक आहेत. त्यांच्या एकाही पत्रात खाडाखोड किंवा शुद्धलेखनाची चूक नाही. त्यानी भारताच्या प्रांताप्रांतात असणार्‍या नगरांतून आणि उपनगरांतून विहार केला. घराघरातील आबालवृद्धांना नावानिशी लक्षात ठेवले. मला वेळ नाही, असे म्हणून एकही काम टाळले नाही. नागपूरच्या रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी भास्करेश्वरानंद हे बंगाली होते. त्यांना ज्ञानेश्वरी अभ्यासावयाची होती. त्यांनी गुरुजींना साकडे घातले. श्री गुरुजींनी त्यांना समग्र ज्ञानेश्वरी इंग्रजीतून समजावून दिली. स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील भाषणांचा मनासारखा मराठी अनुवाद उपलब्ध नव्हता. गुरुजींनी तो केला. गुरुजी हे प्राणिशास्त्राचे विद्यार्थी. बनारस विद्यापीठाचे एम.एस्सी. न्यायमूर्ती हिदायतुल्ला जेंव्हा कायद्याचे प्राध्यापक होते, तेंव्हा त्यांचे आवडते विद्यार्थी होते गोळवलकर! गुरुजींच्या निवासस्थानावर काही काळ ‘वकील’ ही अक्षरेसुद्धा झळकून गेली. गुरुजींना काही काळ परमार्थाचे वेड लागले आणि समाधीसाधनासाठी सारगाछी येथील रामकृष्ण आश्रमाच्या शाखेत ते जाऊन राहिले. त्यांची दाढी आणि जटा हे त्या काळी प्राप्त झालेले वैभव गुरुंच्या आग्रहास्तव त्यांनी जन्मभर जतन केले. विवेकानंद घरोघर जावेत यासाठी कन्याकुमारी स्मारकाची कल्पना गुरुजींना स्फुरली. प्रेरणा गुरुजींची, कर्तृत्व एकनाथजींचे आणि हात समाजाचे, असा प्रकार घडला. आपल्या जीवनसंगीतात स्वार्थाचा सूर नसावा म्हणून गुरुजी यतीचे जीवन जगले. त्यांना गुरुजी हे अभिलषणीय पद कसे प्राप्त झाले ? गुरुजी बनारस विद्यापीठात शिकत होते. त्यांचे अनेक सांगाती संघ कार्यकर्ते होते. गुरुजी संघात जात नव्हते; पण कार्यकर्त्यांची तळमळ पाहून त्यांचे अभ्यासातले मागासलेपण दूर करण्यासाठी गुरुजी त्यांचे विषय स्वतः अभ्यासून त्यांना शिकवीत. कामापायी तास बुडविणार्‍यांना गुरुजींनी तारले. कोणी तरी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले आणि ‘गुरुजी, धन्य तुम्ही’ असे म्हटले. ‘गुरुजी’ तेव्हापासून जगाचे आणि जन्माचे गुरुजी झाले.

श्री गुरुजींचा जन्म १९ फेव्रुवारी १९०६ या दिवशी नागपूर येथे झाला. गोळवलकर हे तसे कोकणातल्या गोळवलीचे. वडील शासकीय विद्यालयात काम करीत. नोकरीचा धागा हाती धरुन ते मध्य प्रांतापर्यंत पोचले. सदाशिव बाळकृष्ण गोळवलकर हे गुरुजींचे वडील नागपुरात ‘भाऊजी’ म्हणून परिचित होते. त्यांच्या आईंना सर्व जण ‘ताई’ म्हणत. सेवानिवृत्तीनंतर भाऊजी रामटेकला राहिले. भाऊजींना नऊ अपत्ये झाली; पण त्यातली आठ दगावली. त्यांचा निष्फळ संसार सफल करणारे अखेरचे फळ म्हणजे माधव. या माधवाने शिकावे, मोठे व्हावे आणि सुखाचा संसार करावा, असे वडिलांना वाटे. त्याच्या ध्यानीमनी नव्हते, कि हा संन्यस्त मुलगा समाजाचा संसार करील. पण स्वतःच्या संसारात रमणार नाही. १९२२ मध्ये चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमधून गुरुजी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये घेऊन डॉक्टर होण्याच्या तयारीने ते लखनौला गेले. तेथे त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला नाही. मग ते वाराणसीकडे वळले. ते बनारस हिंदू विद्यापीठातून १९२६ मध्ये बी.एस्सी. व १९२८ मध्ये एम.एस्सी. झाले. प्राणिशास्त्राचे ते विद्यार्थी होते. जीवनांत यानंतर सतत संशोधन करावे, या हेतूने ते मद्रासला गेले; पण मद्रासचे हवामान त्यांच्या प्रकृतीला मानवले नाही. ते परत घरी आले. त्यांचे मामा रायकर हे खासगी वर्ग चालवीत. त्यात ते शिकवू लागले. नागपूरच्या विद्यार्थी जगतात सर्वप्रिय झाले.

नागपूरचे एक अंध संगीतज्ञ गुरुजींचे बालमित्र होते. या अंधमित्राकडून गुरुजींनी संगीताची संथा घेतली. आपल्या अंधत्वामुळे आपण व्यासंग करू शकलो नाही, ही बालमित्राची खंत दूर करण्यासाठी गुरुजींनी अनेक ग्रंथांचे मोठमोठ्याने वाचन करुन सावळारामाला ज्ञानी केले. १९३३ मध्ये बनारस विद्यापीठाने त्यांना प्राणिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पाचारण केले. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी होती. पंडित मालवीय यांच्या भेटीगाठीसाठी डॉक्टर हेडगेवार बनारसला येत. त्या काळात त्यांनी गुरुजींना पाहिले, अभ्यासले आणि अक्षरशः आत्मसात केले. विवेकानंद भक्ताला संघकार्याच्या धुरेला जुंपावे, असे डॉक्टरांना वाटू लागले ; पण हा भक्त सरळ सरळ एका मठात मुक्काम करुन राहिला. १९३६ मध्ये त्यांचा विद्यापीठाचा सेवा काल संपला आणि गुरुजी साधनेसाठी सारगाछी आश्रमात गेले. १९३७ च्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर त्यांना अखंडानंदांनी अनुग्रह दिला. अखंडानंद स्वतः भगवान रामकृष्णांचे अनुग्रहित होते. या दीक्षाविधीनंतर थोड्याच दिवसांत अखंडानंद समाधिस्थ झाले. स्वामींनी जाण्यापूर्वी एक भविष्य वर्तविले होते - ‘अरे गोळवलकर, तुझा जन्म विवेकानंदासारखा राष्ट्रकारणासाठी आहे. तू येथे फार काळ राहू शकणार नाहीस. ‘राष्ट्रदेवो भव’ हा मंत्र जपत तू देशभर फिरशील.’ गुरुजी आपल्या अध्यात्मगुरुंच्या निर्वाणानंतर अस्वस्थ झाले. त्यांनी आश्रम सोडला. ते पुन्हा नागपूर गेले. तेथे एक रामकृष्ण या विवेकानंदाची वाट पाहत होते. एका केशवाने एका माधवाची केलेली प्रतीक्षा ही दोघांची तपस्या ठरली.

आजवरच्या अनुभवांनी श्री गुरुजींचे मन मोकळे झाले होते. दृष्टी व्यापक झाली होती. समाधिसौख्याची जागा राष्ट्रहिताने घेतली होती. अशा अवस्थेत डॉ. हेडगेवार यांनी त्यांना जवळ केले. डॉक्टरांना आपला उत्तराधिकारी भेटला. विद्वान, विरक्त आणि राष्ट्रनिष्ठ! येथून पुढचा गुरुजींचा प्रवास वेगाने घडला. १९३७ च्या मार्च महिन्यात गुरुजी परत आले. १९३९ च्या फेब्रुवारी महिन्यात डॉ. हेडगेवार यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांचे सिंदी येथे एक विचारशिबिर घेतले. त्यात एकनाथजी रानडे, यादवराव जोशी, अप्पाजी जोशी, बाळासाहेब देवरस आणि गुरुजी हे उपस्थित होते. दहा-बारा तासांची ही बैठक होत असे. दहा-बारा दिवसांचा हा वाग्यज्ञ होता. संघ परिवाराचा आकृतिबंध, कार्यपद्धती, प्रार्धनागीत, ध्येयधारणा या बाबींचा सांगोपांग विचार झाला. डॉक्टर थोडे अधीर होते. त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांना शेवट दिसत होता. १९३९ चा गुरुपूजन समारंभ झाला आणि डॉक्टरांनी आपल्या कार्याची धुरा गुरुजींच्या खांद्यावर ठेवली. अप्पाजी जोशींना अगोदरच हे सूचित करण्यात आले होते. २१ फेब्रुवारी, १९४० या दिवशी डॉक्टरांची प्राणज्योत मालवली. जाता-जाता ही ज्योत मागे दीपस्तंभ ठेवून गेली. त्यामुळे कोठे अंधार दाटला नाही. डॉक्टरांची निधनानंतरची ३३ वर्षे गुरुजींनी संघाचे सारथ्य केले. या दीर्घ कालावधीत संघाने अनेक चढउतार पाहिले. संघबंदीचा आदेश निघाला. गुरुजींना कारावास घडला. सावरकरांपासून गोळवलकरांपर्यंत अनेक जण संशयित आणि देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न झाला. पण हा वनवास संपला.

गुरुजी कार्यकर्त्यांना सांगत, “हे जीवन नावाचे इंद्रियग्राम फार बलवान आहे. थोडे दक्ष रहा. अव्यवस्थित चित्त हे शापासमान आहे. संस्कारित व्हा.” टीकाकार त्यांचा प्रतिवाद करू पाहात. त्यावर गुरुजी म्हणत, “राष्ट्र हे मानवाकुलाचे एक स्वाभाविक परिमाण आहे... अगदी एकाकी व्यक्ती ही शून्यवत आहे. माणूस जन्माला येतो तो घरात. लहानाचा मोठा होतो तो गावात. तो वाढत राहतो तो समाजात. या समाजाचे परिणत रूप म्हणजे राष्ट्र. राष्ट्रावर असणारे जीवनमूल्यांचे आकाश म्हणजे धर्म. या आभाळात कधी धूळवादळ होईल, पालापाचोळा उडेल, कधी ढग जमा होतील; पण शेवटी ते निरभ्र होईल. हिंदुत्वाच्या गगनाखाली असणारे राष्ट्र ते हिंदुराष्ट्र. ”

आपल्या ३३ वर्षांच्या खडतर जीवनाने गुरुजी थकत गेले. १९६९ ते ७३ या काळात ते सतत आजारी होते. १९७० मध्ये डॉक्टरांनी निदान केले, की गुरुजींना कॅन्सर झाला आहे. हे ऐकून अनेकजण व्याकूळ झाले; खचून गेले. गुरुजी शांतपणे म्हणाले, “देह विनाशी आहे. राष्ट्रकार्य अविनाशी आहे. ”

५ जून, १९७३ या दिवशी गुरुजींनी देहत्याग केला.

डॉ. हेडगेवारांच्या समाधिस्थानासमोर त्यांना मंत्राग्नी देण्यात आला. त्या धगधगत्या अग्निज्वालातून एक प्रार्थनागीत निनादले : “नमस्ते सदावत्सले मातृभूमे।”

प्रतिक्रिया
 
On 22/07/2016 03:06 PM Amit Sakpal said:
हा लेख म्हणजे प्रत्येकाने देश्प्रेमाविषेची अप्रतिम उद्धरण आहे

 
On 27/09/2013 09:59 PM राजेंद्र शिंदे(महिमानगड) said:
भाषेवर प्रभुत्व असणारा व्याख्याता .सातारचा बुलेंद आवाज.

 
On 14/01/2012 09:11 PM मकरंद दामले रत्नागिरी said:
शत नमन माधव चरण में

 
On 25/06/2011 03:48 PM seema said:
Bright and great persanality

 
On 22/06/2011 02:34 PM Priyatosh said:
अप्रतिम आणि स्फूर्तीदायक , --- त्वदीयाय कार्याय बध्दा कटी हं

 
On 29/10/2010 04:17 PM vishal said:
shivajirao bhosale gret persanality