Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हमटा पास !

Anil Nene
Friday, August 26, 2016 AT 09:55 PM (IST)
हमटा पास !

हिमालय विराट आहे, विक्राळ आहे, अफाट आहे आणि अगाध आहे ! जवळजवळ २००० मैल लांब आणि ४०० मैल रुंद हिमालय, काश्मीर, गढवालपासून सिक्किम पर्यंत आपलं रौद्र रूप, सौंदर्य, वृक्षाराजींची अमाप संपत्ती, बर्फाच्छादित

उत्तुंग शिखरांची भव्यता, मोठमोठ्या नद्यांचा उगम, पशुपक्षांची नेत्रदिपकता, ऋषी मुनींच्या वास्तव्याने आलेले पावित्र्य, धार्मिक, पौराणिक स्थळ दाखवत, मोठ्या दिमाखात यात्रेकरूंना, भटक्यांना ( trekkers )  साद घालत, गिर्यारोहकांना आव्हान देत, निसर्गप्रेमींना आकर्षित करत “नगाधिराज” हि बिरुदावली उंचावत आज शेकडो, हजारो वर्ष भव्यतेत उभा आहे !

सागरमाथ्याच्या नगाधीराज्याच्या सादाला प्रतिसाद दिला कि तुम्ही हिमालयाचे होऊन जाता. जणु काही हिमालय तुम्हास पछाडतो ! सतत हिमालयात जाण्याची, हिमालयाच्या महानतेच्या दर्शनाची आस लागते आणि तुम्ही हिमालयांत जाण्याची संधी शोधत रहात जाता !

हेच विचार १२००० फुटावरच्या “हमटा पास” मध्ये उभं राहिल्यानंतर माझ्या मनात येत होते. “हमटा ऋषी” असा फलक वाचत असताना आपल्याला हिमालयाचं वेड लागल आहे हे कळत होतं. जवळजवळ ९ तास खडतर चालल्याचे परिश्रम एका क्षणात नाहीसे झाले आणि जमदग्नी ऋषींनी तपस्या केलेल्या त्या स्थानास मी साष्टांग दंडवत घातले. होय.. येथेच जमदग्नी ऋषींनी तपश्चर्या केली होती. तिबेटन बुद्ध जमदग्नी ऋषींना “हमटा ऋषी” म्हणतात. म्हणून हा देवभूमी हिमाचल प्रदेशातील विलक्षण शांत, मोठमोठ्या दगडांनी भरलेला, विविध “अल्पाईन” फुलांनी नटलेला, दुधाळ, थंडगार पाण्याच्या ओढ्यांनी धावत असलेला, देखण्या प्रप्रातांच्या संगीताने भारलेला “हमटा पास” भटक्यांना  ( Trekkers ) सदैव आकर्षित करत राहिला आहे !

१७ जुलैला सकाळी दिल्लीच्या विमानतळांवर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधील डॉक्टर्स धनंजय केळकर, केदार जोशी, मंजिरी रानडे, पद्मा कर्वे व विक्रम ओक उतरले. मी त्यांना भेटलो आणि आमची बस मनालीला जाण्यासाठी निघाली. अंबाला, चंदीगड, कुलू मार्गे मनालीला पोहचण्यासाठी आम्हास तब्बल १७ तास लागले ! आम्ही रात्री २ वाजता हॉटेलमध्ये पलंगावर अंग टाकलं ते सकाळ कधी झाली ते लक्षातही आलं नाही.

तरी हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेशातून भारताच वेगळेपण, मस्त खाणं पिणं, गप्पा ह्यात खरंतर सुरेख वेळ गेला, तरी पण सतरा तासांच्या प्रवासाचा शीण सगळ्यांच्याच अंगावर नक्की आला होता! दिल्लीपासून जवळजवळ ५०० किलोमीटर दूर असलेली ६००० फुट उंचीवर असलेली, हिमालयाच्या कुशीत वसलेली मनाली देखणी आहे. ‘मनू’ मुळे ह्या शहराचं नाव “मनाली” पडलं किंवा ‘मनू’ने वसवली ती ‘मनाली’ मनात भरते. मनूच्या वास्तव्याने पुनीत झालेली मनाली देवदार, पाईन सारख्या अत्यंत उंच, गर्द झाडांच्या सावलीत नांदते आहे. साहजिकच हिमालय प्रदेशातील मनाली हे सुंदर हवा खाण्याचं ठिकाण नाही झालं तर नवल. हिमाचल प्रदेशांसही उत्तराखंडप्रमाणे “देवभूमी” का म्हणतात ह्याच प्रश्नाचं उत्तर मनालीत मिळत. मनुने वसवलेल्या मनालीत काही आश्चर्यकारक, कधीही माहित नसलेल्या गोष्टी बघावयास मिळाल्या !१८ जुलैला सकाळी न्याहारीनंतर सर्व डॉक्टर मंडळी व मी कॅम्पौंडर मनाली दर्शनास निघालो आणि मला पहिला आश्चर्याचा धक्का बसला. गर्द वनाराजीतील ‘हिडींबा’चं मंदिर बघून ! भीमाची राक्षस कुळातील पत्नी हिडींबा हिचं देऊळ ! मनालीला लागूनच असलेल्या किंवा आता मनालीचाच भाग झालेल्या “डूंगरी” खेड्यात “हिडींबा”चं लाकडी देऊळ आहे. कदाचित हवामानामुळे असेल पण देवळावर शिखराऐवजी ३ उतरत्या पत्र्यांची चौकोनी छतं किंवा छतांच शिखर ( कॅनपी ) आहे. राजा बहादूरसिंहाने १५५३ मध्ये हे देऊळ बांधलं. देवळाच्या बाजूस १२ फुट उंचीवर प्रदक्षिणा घालण्यासाठी व्हरांडा बांधलेला आहे. देवळाच लाकडी प्रवेशद्वार व खिडक्यांवर अप्रतिम कोरीव काम असून देवदेवतांच्या मूर्ती, पशुपक्षी, वृक्षवल्ली कोरलेल्या आहेत. महिषासुर मर्दिनी, शंकर, पार्वती, नंदी आदि मूर्ती देवळाच्या उजव्या हातास तर डाव्या हाताच्या तळास लक्ष्मी. विष्णू. गरुड कोरल्या आहेत. मध्यभागी गजानन तर वरच्या भागात बौद्धकालीन प्रतिमा कोरल्या आहेत. गाभाऱ्यात हिडिंबा देवीची मूर्ती आहे.

हिडिंबेस देवता मानून, तिचे सुरेख देऊळ बांधून, तिची पूजा अर्चा होत असलेली बघून मला खरंच आश्चर्य वाटलं. मनालीच्या मानाने देवळात बऱ्यापैकी गर्दी होती. नेहेमीप्रमाणे प्रवेशाच्या दोन्ही बाजूस रस्त्यावर पूजासाहित्य विकणारी मंडळी बसली होती. तितकच आश्चर्य वाटलं महान योद्धा घटोत्कचाच देऊळ पाहून. डुंगरी गावातच घटोत्कचाच वास्तव्य होत. पांडवांच्या विजयात घटोत्कचाचा खूप मोठा वाटा होता. अर्जुनाच्या नाशासाठी कर्णाने आपलं ‘अमोघ’ अस्त्र मुद्दाम राखून ठेवलं होत. आपल्या अतुलनीय पराक्रमाने घटोत्कचाने कर्णास रणभूमीवर उतरायला लावलं आणि त्याच्या अमोघ अस्त्राचा नाश करून अर्जुनास बचावल आणि पांडवांच्या विजयाचा मार्ग खुला करून दिला. “कामकांतका” ही घटोत्कचाची पत्नी, शक्तीची प्रखर उपासक होती. अनेक वरांबरोबर ‘शक्ती’ ने घटोत्कच आणि कामकांतकास “बारबरीक” नावाचा अतुल्य मुलगा दिला. बारबरीक आपल्या एका बाणाने संपूर्ण सैन्याचा नाश करू शकत असे.

आपल्या गुरूच्या आज्ञेप्रमाणे हरणाऱ्या सैन्याची बाजू घेण्याची शपथ घेतलीं होती. कृष्णाने मागणी केल्याने बारबरीकने आपलं मस्तक कृष्णास अर्पण केलं आणि ‘शीश’ ह्या नावाने प्रसिद्ध पावला. घटोत्कच जेथे बसून पूजा अर्चा, तपस्या करत असे तेथेच घटोत्कचाच देऊळ आहे. कुलूच्या ‘सेराज व्हॅली’ मध्ये अनेक देऊळे आहेत जेथे वीर घटोत्कचाची पूजा होते !

महर्षी वशिष्ठ ही मनालीत रहात होते. वशिष्ठ ऋषींच प्राचीन मंदिर बघण्यासारख आहे. लाकडी देऊळ, प्रवेशद्वार, येथील कोरीव काम वाखाणण्यासारखं आहे. वशिष्ठ ऋषींचं लाकडावर कोरलेलं शिल्प खरोखरच अप्रतिम आहे, वशिष्ठ ऋषी सिंहासनावर बसलेले असून समोर मोर उभा आहे, डाव्या हातात कमंडलू आहे. उजव्या हातात पोथी आहे. असं हे भव्य लाकडी शिल्प बघत राहव असं आहे. वशिष्ठांच्या धोतराच्या चुण्या, सुरकुत्या आणि तत्सम बारीकसारीक गोष्टीही कारागिराने सुरेखपणे साकारल्या आहेत.

सांगचर, सोहिल, कुल्तांग, मच्छाज, मलाना आदि कुलू जिल्ह्यातील गावात आणि अर्थातच ‘हमटा पास’ येथे भगवान परशुरामाचे वडील, रेणुका मातेचे यजमान, जमदग्नी ऋषीचं वास्तव्य होते. येथेच त्यांनी तपश्चर्या केली. विश्वामित्र ऋषीही ह्याच भागात रहात होते आणि ज्या अर्थी हिडींबा आणि घटोत्कच यांची देऊळे ह्या भागात आहेत त्याअर्थी पांडवांच वास्तव्यही येथे होत असं अनुमान काढता येत.

केल्याने देशाटन... माझ्या ज्ञानांत भर घातल्याबद्दल धन्यवाद मनाली!

मनसोक्तपणे मनाली बघून १९ जुलैला “जोबडिनाल” ह्या ९००० फुटावर असलेल्या आमच्या ट्रेकच्या सुरुवातीच्या टप्प्यावर जाऊन पोहोचलो. मनाली ते जोबडिनाल हा दोन अडीच तासांचा मोटारीचा प्रवास अत्यंत रम्य होता. हिमालयाच्या अंगाखांद्यावरून, आजूबाजूच्या देवदार, सूचिपर्ण आणि पाईन्सच्या गच्च झाडीतून मस्तीत चाललो होतो. तेवढ्यात थांबा थांबा असा गलका झाला आणि आम्ही थांबलो.

‘हिमालयन ग्रिफिन’चा घोळका बघायला ! १५ – २० ग्रिफिन आमच्या आसपास मुक्तपणे आपले प्रचंड पंख पसरून विहंगत होते. काही दगडावर जणु आमच्याकडेच पहात बसले होते. अवर्णनीय दृश्य होतं हे... ह्या पक्षांवर नजर ठरत नव्हती! सर्वांनी क्लिक्लिकाट केला व ग्रीफिन्सच्या घोळक्यास आपल्या कॅमेऱ्यामध्ये कायमच बंदिस्त केलं, कॅमेऱ्यातच उडायला बागडायला बंद केलं.

जोबडिनालला आम्ही उतरून गरम गरम चहाचा, गुडदाणीचा, राजगिऱ्याच्या वड्यांचा आस्वाद घेत होतो तोपर्यंत पोर्टर्सनी आमच सामान खेचरांवर चढवलं आणि आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया असा गजर करत प्रत्येकाने आपल्या काठ्या सरसावल्या आणि चालायला सुरुवात केली. अदमासे `१०५०० फुटांवर असणाऱ्या ‘चिका’ येथे आम्ही रात्री मुक्काम करणार होतो. साधारणपणे ११००० फुटांपर्यंत हिमालय गच्च वनराजीने भरलेला आहे. त्यानंतर जसजस वर जाव तसतस झाडांच जंगल मागे मागे रहात आणि उघडा बोडका हिमालय चालणाऱ्यांची साथ करायला लागतो. माझ्या बरोबरची सर्व डॉक्टर मंडळी तरुण होती. माझ्यापेक्षा २० वर्षांनी लहान होती. त्यामुळे संपूर्ण ट्रेकभरच ती लोकं झरझर मार्ग कापत. मी मात्र हळूहळू चालत होतो त्यातून मधुमेह माझा जोडीदार ! चीकाला अर्थातच हा तरुण वर्ग अडीच ते तीन तासात पोहोचला तर मला चार तास लागले. श्रीपादने मात्रा माझी साथ कधीही सोडली नाही !

हिमालयतला हा माझा पाचवा ट्रेक ! प्रत्येक ट्रेकमध्ये मी बहुतेक सर्वांत मोठा ! आणि मधुमेही ! त्यामुळे एव्हरेस्ट बेस कॅम्प, रुद्रगेरा, रुपीन पास किंवा कांग-चेन-झोंगा (कांचनगंगा हा उच्चार चुकीचा आहे) बेस कॅम्प ट्रेक असो मी सर्वात शेवटचा ! मी विनोदाने म्हणतो तुम्हीं तरुण पोर - पोरी नीट रहात आहात का नाही हे बघण्यासाठी मी मुद्दामच हळू चालून तुमच्या मागे राहतो, तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ! माझ्या पाचही ट्रेक्समध्ये मात्र एकानेही माझ्या हळू चालाण्याविषयी कधीही तक्रार केली नाही. प्रत्येकाने मला सतत प्रोत्साहनच दिलं. दिवसाच्या शेवटी माझं टाळ्या वाजवून स्वागतच केलं. आणि तसचं स्वागत मी सगळ्यांच्या नंतर जेंव्हा ‘चिका’ला पोहोचलो तेव्हा सर्व डॉक्टर्सनी माझं टाळ्या वाजवून स्वागत केलं ! तंबू उभारले होते, गरम गरम चहा तयार होता. जोबडीनाल ते चिका हे ट्रेकमधील सर्वात कमी अंतराच चालणं होत. तरी चार तासाच्या चढाच्या चालण्याने मी नाही म्हटलं तरी थकलो होतो. झकास चहा पिऊन तंबूत अंग झोकून दिलं. तरुण डॉक्टर मंडळी परत इकडे तिकडे उधळली. अगदी खेचारांप्रमाणे ! अंगावरचं ओझ उतरल्या बरोबर हि खेचर उत्कृष्ठ हिमालयन चाऱ्याच्या शोधात संध्याकाळीच जी गडप होत ती दुसऱ्या दिवशी सकाळी पोर्टर्सना शोधून काढावी लागतं. खेचर कुठे जात, रात्रभर कुठे चरत, आणि पोर्टर्स त्यांना सकाळी कसे शोधून काढत त्यांनाच माहिती !

विलोभनीय सूर्यास्तानंतर काळोखाने अख्ख्या हिमालयात स्वतःच्या दुलईत घेतलं आणि एका वेगळ्या अनोख्या वातावरणाचा आनंद परत लुटायला मिळाला. हिमालय वेगवेगळया दिवसाच्या वेळी वेगवेगळा दिसतो, भासतो, कधी अक्राळ विक्राळ, तर कधी सौंदर्याने नटलेला कधी भीतीदायक, तर कधी आनंदी, विलोभनीय, कधी पावसात नहालेला, तर कधी बर्फात बुडालेला. हिमालयाच प्रत्येक रूप आगळ आणि प्रत्येक रूप वेगळ, सर्व भावनांनी, रंगांच्या सर्व छटांनी निसर्गाचा अविष्कार कधी स्पष्टपणे, तर कधी हळुवार उलगडणार ! हिमालयातील पहिल्या रात्री आम्ही जेवणाच्या तंबूत जमलो. अनेक प्रकारच्या गप्पा आठवणीसह जेवणाचा आस्वाद प्रत्येक जण घेत होता. आणि ट्रेक संपेपर्यंत असेच रोज रात्री आम्ही एकत्र येऊन अनेक विषयांवर गप्पा मारत जेवत होतो. ट्रेक मध्ये जेवण अगदी बेसिक असतं. सगळाच मुद्पाकखाना अगदी जळणासहीत रोज खेचरांच्या पाठीवरून हलतो. त्यामुळे भात, आमटी, भाजी हे मुख्य जेवण. कधीकधी पोळ्याही मिळतात जर बल्लवाचार्य खुष असेल तर! जेवणानंतर मात्रा “स्वीट डिश” हमखास असायची. जेवण झाल्यावर तंबूत आडवा झालो आणि कधी झोप लागली कळलही नाही !

२० जुलै ची प्रसन्न सकाळ उजाडली ! संपूर्ण ट्रेकभर आमच्यावर निसर्गाने खरंच कृपा केली. दिवसभर लक्ख ऊन, अर्ध्या बाहीच्या शर्टावर आणि अर्ध्या चड्डीवर ते सुद्धा हिमालयात आम्ही चालत होतो. किती लक्ख ऊन, तर मला चक्क ‘सन बर्न’ झालं दोनही हातावर व तोंडावर ! नाही म्हणायला एकदा चार शिंतोडे आले आणि वरूण राजाने आपलं अस्तित्व दाखवल ! पण एकूण अप्रतिम हवेत आमचा ट्रेक झाला !

सकाळी उठल्यावर गरम पाण्याने तोंड धुतलं, शौचादी कार्यक्रमासाठी बैठक असलेला वेगळा तंबू जरा दूर अंतरावर नेहेमीच उभारला जायचा तो फार सोयीचा होता. झकास पराठ्याची न्याहारी करून आम्ही सर्व जण सज्ज झालो. साधारण १२००० फुटावर असलेल्या “बालुका घेरा” ह्या ठिकाणी जाण्यासाठी. माझ्यासाठी प्रवास खडतर होता हे दिसतच होत पण मनालीपासून ‘राणी’ नदी साथ देत होती. तिच्या वाहत्या पाण्याच्या तालावर मी माझा चालण्याचा ताल धरला होता. पण चालण अवघड वाटत होत कारण हिमालयाने आपलं बदलले रूप ! वनराई. हिरवाई केंव्हाच मागे राहिली होती. आता मोठमोठे दगड, प्रचंड धोंडे, शिळा ह्यातून मार्ग काढायचा होता.
 
रस्ता किंवा पायवाट तर कुठेच दिसतं नव्हती त्यामुळे चालण मंदावत होत. त्यातून चढण तर होतीच, हिमालयात ती कशी चुकेल? बरोबर श्रीपाद होता त्याच्याबरोबर चालत राहिलो सतत ८ तास ! मधेच थांब, पाणी पी, काहीतरी खा असं करत “बालुका घेरा” ला पोहचायला मला ८ तास लागले. पाय बोलायला लागले होते. अगदी थकून गेलो होतो. तेवढ्यात दुरवर आमचे उभे रहात असलेले तंबू बघून हायस वाटल, तरी झपझप चालण्यासाठी त्राण नव्हता. एवढ्यात आमचा वाटाड्या ( गाईड ) माझ्या दिशेने चालत येताना दिसला. माझ्याजवळ आला आणि म्हणाला,’ पुढे एक छोटी नदी आहे, ती आपल्याला पार करायची आहे. ती पार केली कि आपला कॅम्प आलाच. तरी तुम्ही बूट काढाच आणि ट्राऊझर गुढघ्यापर्यंत दुमडा.’ त्याने माझे बूट घेतले पाठीवरची बॅग घेतली व म्हणाला चला... पाण्यात पाय घातले आणि पाय बधीर झाले. पावलांची संवेदनाच गेली इतकं पाणी गार होतं ! कदाचित बर्फाच पाणीही ह्यापेक्षा कोमट असेल ! बाहेर आलो आणि पाय घासत बसलो, पायात जीव आणण्यासाठी, पायात प्राण आणण्यासाठी मदत केली ती टाळ्या वाजवून माझ स्वागत करणाऱ्या डॉक्टर मित्रांनी !
कदाचित थकल्यामुळे असेल किंवा उंचीचा ( High Altitude ) परिणामही असेल मला भूक लागतं नव्हती, शिसारी येत होती उलटी होईल असं वाटत होतं. म्हणून कसबस पोटात काहीबाही ढकललं आणि सरळ आडवा झालो. गप्पा मारत शांतपणे जेवणाचा मोह आवरत नव्हता पण शरीर साथ देत नव्हतं !


२१ जुलैच्या सकाळने झोप चाळवली. तंबूच्या बाहेर आलो ते मस्त हवेतच. आज ट्रेकचा महत्वाचा टप्पा गाठायचा होता हमटा पास ! सकाळच्या नैमित्तिक गोष्टी, न्याहारीसकट उरकल्या आणि हमटा पासच्या दिशेने पावलं वळवली. हमटा पास अदमासे १२.५ - १३ फुटावर आहे. ट्रेकमधील सर्वात उंच टप्पा. तेथून मग उतरायला लागायचं होतं. १२००० फुटावरच्या ‘शिआ गोरु‘ येथे वस्ती करण्यासाठी. ‘राणी’ नदीची आणि मोठमोठ्या शिळांची साथ होतीच. मजल दरमजल करत साधारण ७ तासानंतर थांबलो. “हमटा ऋषी” ह्या फलकापाशी ! हमटा पास मध्ये कोणी हा फलक करून लावला असेल कोण जाणे! पण फलक वाचल्यावर आंबलेल्या शरीरात उत्साह आला. फलकाशेजारी बसलो. विहंगम दृश्य न्याहाळत. आसपास हिमाच्छादित शिखरांनी वेढलेला, भरलेला हिमालय बघून मन प्रसन्न झालं. काही शिखरांवर ताज बर्फ पडलेलं दिसतं होतं. रात्रीच्या थंडीत हे ताज बर्फ शिखरांवर शिवरल असावं  !

हवेत चांगला उबदारपणा होता. त्यामुळे हिमालय डोळ्यात साठवताना मजा येत होती. तरी सुद्धा सकाळी नदी ( दुसऱ्यांदा ) पार करत असतानाच्या “बर्फाळ” आठवणी मनातून जायला तयार नव्हत्या ! आगीपेक्षा, विस्तवापेक्षा थंडगार पाणी जास्त “भाजू” शकतं हा दोनदा घेतलेला अनुभव विसरण अशक्य.
हमटा - जमदग्नी ऋषींना दंडवत घातला. दर ट्रेकमध्ये सुखाचा जीव दु:खात घातला ते सुद्धा पैसे खर्च करून! उंचीवर चालण्याचे कष्ट High Altitude Sickness  सह आमंत्रण देऊन बोलाविले म्हणून मी स्वतःस सतत शिव्या घालतो. पण ट्रेकच्या सर्वोच्च टप्प्यावर पोहचल्यानंतर, ट्रेक संपल्यानंतर वाटत “Every single step full of pains, every effort was worth it !” 

ज्या ठिकाणी जमदग्नी ऋषींनी तपश्चर्या केली होती. तेथे पोहोचल्यानंतर हेच वाटलं, धन्य झालो!  श्रीपाद म्हणत होता “काका आता शिओगोरु पर्यंत झकास उतरत जायचं आहे त्यामुळे आरामात चला...” कसला उतार ? चढ उतार होताच मोठमोठ्या शिळा, दगड, धोंडे होतेच ! थांबत थांबत सतत २ तास चालल्यानंतर शिआगोरुच्या कॅम्प मध्ये २-३ तास आधी आलेली डॉक्टर मंडळी माझ्या स्वागतासाठी सिद्ध होती ! वाटत होतं, चला आता चालणं संपलं आहे ! कुठल काय? परत सकाळी उठून चालणं होतच ! २२ जुलैच्या सकाळी ‘छटाडू’ ह्या साधारण ११००० फुटावर असलेल्या ठिकाणी पोहचण्यासाठी आमचा काफिला निघाला. आता साथीला ‘चंद्रा’ नदी होती. त्या मानाने चाल बरी होती. आधीच्या काही दिवसांच्या चाली इतके कष्ट नव्हते तरीही मला ‘छटाडू’ला पोहचायला ५ तास लागले ! तर इतरजण माझ्या आधी निदान तासभर तरी पोचले होते.

ह्या प्रवासात मला एक विचित्र अनुभव आला ! चंद्रा नदी सतत चढ चढत वाहते आहे असं दिसायला लागलं ! पाणी नेहेमी उतार शोधत, मग आपल्याला पाणी चढावावरून चढताना कसं दिसत आहे ? हा आपल्याला भ्रम तर होत नाही ना? का High Altitude मध्ये आपल्याला Brain Oedema तर झाला नाही? नदी तर सारखी चढताना दिसते आहे ! पण पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहिलं तर तीच नदी उतारावरून भरधाव वेगाने वाहत असताना दिसत होती! हा काय चमत्कार आहे ते कळत नव्हत पण नदीकडे सारख बघावसं वाटत होतं. मला वाटलं मला एकट्यालाचं भास होतो आहे. पण नंतर केदार जोशी म्हणाला त्यालाही माझ्यासारखंच दिसतं होतं. हे ऐकल्यावर मी ‘नॉर्मल’ आहे हे मला जाणवलं कारण एका डॉक्टरला माझ्यासारखाच भास होत होता ! हा अनुभव मी कधीही विसरणार नाही !
छटाडूला आमचा ट्रेक संपला होता. म्हणजे पायी चालणं संपलं होतं. आता चंद्रतालला आम्ही मोटारीने जाणार होतो. छटाडूच्या एका टपरीत मस्त चहापाणी झालं. सगळेच ताजेतवाने झाले मोटारीत बसण्यासाठी. मनाली ते जोबडीनाल ह्या प्रवासाप्रमाणेच छटाडू ते चंद्रताल हा प्रवासही रम्य होता, प्रेक्षणीय होता. बाजूने चंद्रा धो धो धावत होती. चंद्रतालला पोहोचेपर्यंत ४ – ४:३० वाजले होते. आम्ही परत १००० फुट चढून वर आलो होतो. १२००० फुटावरील चंद्रतालपासून अर्ध्या पाऊणतासाच्या पायी अंतरावर ‘चंद्रवागा’ ह्या तंबूच्या ‘Resort’ वर गाड्या पार्क करून आम्ही सर्व जण चंद्रताल कडे निघालो. १-२ किलोमीटर चालून आल्यावर जो शांत, अथांग, निळसर, जलाशय दिसला त्याला तोड नाही. आम्हांस संपूर्ण सरोवर दिसलं नाही कारण सरोवर वळल होत पण जे दिसलं ते विलक्षण होत. मन लववणारा होतं. शांत, पवित्र वातावरणाने चंद्रताल वेढला गेला होता.

मी जगातील अनेक पर्वतराजीतील सरोवरे बघितली आहेत. “टेट्रा” पर्वतराजीतील पोलंड मधील “झाकोपाने” शहराच्या जवळील “मरस्की ओको, कॅनेडीयन रॉकीजमधील ‘लेक लुईस’, स्वित्झर्लंडमधील ‘लेक थुन’ सारखी अनेक देखणी सरोवर तळी बघितली आहेत. पण हिमालयातील तळी बघताना मनात जो एक पावित्र्याचा भाव येतो तसा भाव जगातील एकाहून एक अप्रतिम असणारी तळी बघताना आला नाही. कदाचित संस्कारांचा, कदाचित आपलेपणाचा हा भाव असावा !संध्याकाळची किरण विस्तीर्ण जलाशयावर पडली होती. एक प्रकारच गूढ, गंभीर वातावरण तयार झालं होतं. तळ्याजवळच्या एका छोटेखानी टेकडीवर जाऊन मी तळ्याकडे शांतपणे बघत बसलो. बघत असताना मन तृप्त झालं परमेश्वराच्या चमत्काराकडे आणि साक्षात्काराकडे बघता बघता मान आपोआप खाली झुकली. संधीप्रकाशात ‘चंद्र्वागा’ मधील तंबूमध्ये परतलो. तंबूच्या बेसिक वातावरणात ‘चंद्र्वागा’ आलिशान होती. कारण तंबूत छोटेखानी पलंग होते. जेवणाच्या तंबूत खुर्च्या टेबल होती. धुण्यासाठी सदैव गरम पाणी उपलब्ध होतं. चंद्रतालच्या जवळूनच वर “काजा” नावाच्या गावाकडे जाता येतं. गाव मोठं असावं कारण “कुलू – मनाली – काजा” अशी देवभूमी हिमाचल प्रदेशची ST होती. चंद्रतालातूनच आम्हाला सतत साथ देणारी चंद्रा उगम पावते. ‘तांडीब्रिज’ला भागा नदीशी संगम होऊन ‘चंद्रभागा’ तयार होते ! ( तोपर्यंत फक्त पंढरपूरलाच चंद्रभागा आहे एवढच माझ ज्ञान मर्यादित होत ) पुढे वाहत वाहत चंद्रभागा पाकिस्तान मध्ये रावी नदीत जाऊन मिळते चंद्र्तालच्या आसपास भागात २० – २१ हजार फुट उंचीची शिखर आहेत. ‘बडा शिगरी’ हि हिमालयातील सगळ्यात मोठी हिमनदी हि ह्याच भागात आहे.

अशा अनोख्या भागात आल्याच जेवढ अप्रूप होत तेवढच वाईट वाटत होत की उद्या हिमालयास राम राम करून परत जायचं आहे. हा माझा हिमालयाचा ५ वा ट्रेक. प्रत्येक ट्रेक कमालीचा कष्टाचा होता निदान माझ्यासाठी तरी. ट्रेक संपल्यानंतर जे अतीव समाधान मिळायचं ते निर्भेळ कधीच नव्हतं ! कारण त्यात हिमालयापासून दूर जाण्याची हुरहुरही असायची, परत यायला मिळेल की नाही ही  आतुरता असायची, हिमालयाचं परत दर्शन होईल की नाही ही भिती असायची ! परमेश्वर कधीच निर्भेळ सुख देत नाही याचा परत एकदा अनुभव आला !

अशा संभ्रमावस्थेतचं २३ जुलैची सकाळ उजाडली आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला. हिमालयाच्या अंगाखांद्यावरून, वळणावळणातून वर चढत, खाली उतरत रोहतांग पास मधून मस्तीत प्रवास करत, आम्ही मनालीला पोहोचलो. मनालीतून बाहेर पडताना उजव्या हाताने बाहेर पडलो आणि मनालीत डाव्या हाताने प्रवेश केला. एक अविस्मरणीय प्रदक्षिणा पूर्ण झाली.

मोटारीतून उतरताना सहज समोरच्या शिखारांकडे लक्ष गेलं आणि मनोमनी हिमालयास नमस्कार केला तेव्हा हिमालय म्हणाला असेल का – पुनरागमनायच ? !

अनिल नेने
लंडन
हमटा पास !
हमटा पास !
हमटा पास !
हमटा पास !

प्रतिक्रिया
 
On 31/08/2016 04:44 AM prabhakar joshi (prof. said:
सुपरब विचार. मोठे धैर्य. छान टिपणी.

 
On 29/08/2016 08:09 PM लेफ्टनंट जनरल सतीश सातपुते said:
हिमालयाचा आणि माझा परिचय आणि सहवास अनेक वर्षांचा. पण तो वेगळ्या संदर्भात होता. अनिल नेने यांचा गिरीभ्रमणाचा उत्साह व निसर्ग निरीक्षणातला बारकावा वाखाणण्यासारखा आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरसुद्धा या प्रवास वर्णनातून खूप काही नवीन गोष्टी मला कळल्या. हिमालयाच एक नव रूप पहायला मिळालं. नेने यांच्या जिद्दीच कौतुक करावं तितकं थोडंच.

 
On 29/08/2016 11:28 AM preeti Damle said:
अप्रतिम. काका, हिमालय तर सतत साद घालणारा आहेच, पण तुमच्या शब्दांनी आणि वित्रमय वर्णनांनी एकदा बिन कष्टाचा हिमालय फिरून आल्यासारखं वाटलं ... हमता पास ला मी गेलेले नाही, मात्र आता अतिशय उत्सुकता लागून राहिली आहे. आणि ती निर्माण होण्यात सोबतच्या फोटोंचा मोठा वाटाआहे, हे निश्चित.

 
On 29/08/2016 04:29 AM said:
A very excellent article,beautifully written,informative as well as intellectually stimulating.we are proud of you.Harsh Gangoli

 
On 28/08/2016 04:06 AM shree said:
सुंदर लेख !

 
On 27/08/2016 11:35 PM Sujata Dandekar said:
Very nice and extremely educational.This is very encouraging and.I feel like going there, but th.is task seems difficult for me. Very well done.

 
On 27/08/2016 10:49 PM Suresh Dandekar said:
Definitely fascinating and courageous feat of adventure. Very well narrated and informative. In short very well done and congratulations.

 
On 27/08/2016 05:35 PM Dr.padma karve said:
Loved the article.wonderful. It was a joy to read it.

 
On 27/08/2016 02:47 PM VAISHALI KULKARNI said:
Very Innovative and Interested.

 
On 27/08/2016 10:28 AM Ajit Bhide said:
वा अनिलकाका, मस्त!!!

 
On 27/08/2016 10:05 AM Sharad Kulkarni said:
Wonderful travelogue. While reading i really felt the entire journey as if i was part of your group. It is really most incredible that despite being diabetic you made such an adventurous trek. It speaks volume about your tenacity, determination and sublime resolve. May you enjoy many more such visits. You write so well that you need to put together all your travelogues and publish a book. Well done and as Johny Walker says Keep Walking!!!!!!

 
On 27/08/2016 06:16 AM said:
श्रीमंत, अप्रतिम !