Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

कथ्थक शिकवता शिकवता …

Manisha Dongre
Thursday, November 19, 2015 AT 02:14 AM (IST)

कथ्थक शिकवता शिकवता

'मी आणि कथक' – कथक मधुन मी वेगळी काढायचे म्हटले तर मी काही उरते का? ही अथवा अशीच भावना कथकविषयी असणाऱ्या अनेक भाग्यवंत कलाप्रेमी मंडळींपैकी मी एक.


ज्या शुभक्षणी, दृष्टीहीन असणाऱ्या माझ्या बाबांनी या सर्वांगसुंदर दृकश्राव्य कलेशी माझी ओळख करुन दिली त्याक्षणा पासून आजतागायत कधी अभ्यासक म्हणून, तर कधी नृत्यांगना म्हणून, कधी नृत्यशिक्षक म्हणून "जेथे जाते तेथेही माझी सांगाती."


कथकच्या अथांग सागरात डुंबणाऱ्या, न्हाऊन निघणाऱ्या, त्यावर आरूढ होऊन रसिकांच्या मनावर रा़ज्य करणाऱ्या, अनेक मान्यवर गुरू, सुप्रसिध्द नृत्यांगनाया साऱ्यांच्या तुलनेत माझ्या नगण्यस्थानाची मला पूर्ण जाणीव आहे. एका सुप्रसिद्ध संगीतसमीक्षकांनी "नादब्रह्म" याविषयावर आधारित एका परिसंवादात अस म्हंटल होत कि यशाच्या परमोच्च शिखरावर जरी तुम्ही पोहोचला नाही तरी एक साधक म्हणून तुम्ही कोठेही कमी पडत नाही. याचाच आधार घेऊनएका साधकाच्या भूमिकेतून परदेशात कथकनृत्य शिकवताना आलेले अनुभव सांगण्याच धाडस मी करत आहे.१५ वर्षांपूर्वी अमेरीकेत आल्यानंतर दाक्षिणात्य घरांमधील परंपरेनुसार भरतनाट्यम शिकणारे असंख्य भारतीय मला भेटले. मला असणाऱ्या आव्हानाची जाणीव झाल्यानंतर कथकसारख्या सर्वांगसुंदर नृत्यशैलीच्या प्रचारासाठी मी माझे सारे कसब आणि प्रयत्न पणाला लावले. दोन छोट्यांना बरोबर घेऊन कितीही लांबचा प्रवास करून कथकनृत्याचे मिळतील तसे लहानमोठे कार्यक्रम सुरू केले. सोबतच मोजक्या विद्यार्थीनींना घेऊन माझे कथकचे वर्ग देखील सुरू झाले .

भारतात एका विशिष्ट वयानंतर मुली नाचाच्या क्लासला जाण्यासाठी आई-वडिलांवर अवलंबून नसतात. भारतातील शालेयशिक्षण, प्रचारमाध्यमावर सतत चालू असलेले reality shows, समाजातील सांस्कृतिक कार्यक्रम, आणि एकूणच घरातील आणि घराबाहेरील वातावरण या विषयातील सखोलता समजण्यासाठी त्या मुलीना खूप उपयोग होतो.

 

वरील बहुतांशी गोष्टींचा इथे असलेला अभाव, आठवड्यातून एक दिवस एक तासाचा क्लास आणि घरात आणि बाहेर इंग्रजी भाषेचा वापर या पार्श्वभुमीवर अमेरिकेत वाढणाऱ्या या मुलीनाही कला शिकवताना येणाऱ्या आव्हानांची टप्प्याटप्प्याने जाणीव होते आहे.

 

छंदस्वरूप शिक्षण हे अमेरिकेतील भारतीय शास्त्रीय नृत्यशिक्षणाचे स्वरूप. या दुय्यम स्थानावरून चालताना बॉलीवूड्मधील गाणी, folk यासर्वांमधून माखनचोरी, छेडछाड, गोवर्धनलीला, कालीयादमन, या थोड्याफार परीचित भागांपर्यंत मोजक्या मुली पोहोचतात, तेही वर्णन परधावत्या गोडव्याच्या आधारे    (Running commentary जी वास्तवात कथकमधे अपेक्षित नसते). वर उल्लेखिलेल्या अंगणापलीकडे फारश्या नर्तक, नर्तिकांची पावले पडत नाहीत. नायिकाभेदांपैकी अभिसारीका, स्वाधीनपतीका, खंडीता, इथवर पेशकारीची मजल पोहोचते, तीसुद्धा मोजक्याच जणींची आणि तोवर हे छंदशिक्षण थांबते कारण यामुली तोपर्यंत कॉलेजला जाऊ लागतात. तेथेच त्यांची जाणीवही स्थिरावते.

 

नृत्यशिक्षणासाठी ६ ते १२ वयोगटाचा भरणा जास्त. १२ ते १६ त्यापेक्षा कमी आणि १६ पुढील तर अगदीच कमी अशी विभागणी दिसते. यावयोगटामधे वर उल्लेख केलेले आशय, तंत्राची, नृत्याची चौकट एवढे देण्यातच ती इटुकली मिटुकली वर्षे सरून जातात. मानसीक परिपक्वता, प्रगल्भता, अभिव्यक्तीची निकड, आशय जाणवून येणारा निर्मीतीचा झरा अश्या टप्प्यांवर नृत्यविचार, नृत्यशिक्षण आणि नृत्यरचनांची निर्मीती पोहोचण्याची बीजे आजतरी दिसत नाहीत.


एक शिक्षक म्हणून यात खूपच तारांबळ उडते. तपस्वी हट्ट करणे, कधी मतलबी तडजोडी करणे, कधी समूहरचनांसाठी लोकनृत्य अथवा बॉलीवूडकडे वळणे, तर कधी कसबगारीचे नेत्रदीपक प्रकार चालवून घेणे, अशी जुळवाजुळव करावी लागते. खरं कसब पणाला लागते ते या मुलींना अभिनय शिकवताना.  टँकटॉप आणि शॉर्ट्स घालणाऱ्या इथल्या मुलींना कृष्णाने पदर पकडल्यावर राधेचं लाजणं त्यांना समजवण्याचं आणि त्यांच्याकडून अभिनय करून घेण्याचं. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन ते समजावून घेण्याची अभ्यासूवृत्ती इथल्या शिक्षणपद्धतीमुळे मुलांमधे वाढीस लागते.


कित्येकदा आपण सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगायला कमी पडतो, म्हणूनच कि काय ही मुले गोंधळून जातात. ( ABCD :America Born Confused Desi )

" Krishna was such a flirt", असे एखादी त्यातूनच म्हणून जाते.

म्हणूनच इथे शिकवताना पूर्वी कधी पडलेले प्रश्न आता पडायला लागले आहे, त्याची ऊत्तरे शोधत, ती कधी जनात तर कधी मनात देत ,काही अनुत्तरीत प्रश्न तसेच मनाच्या कुपीत बंद करून ठेऊन हा प्रवास सुरू आहे यथाशक्ती माझ्या छोट्या मैत्रीणींना या कधीही संपणाऱ्या कलानंदाची ओळख करून देण्याचा.


उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही या भावनेने घेतलेला हा नृत्याचा वसा घेण्यासाठी उत्सुक अशा ओंजळींसाठी मी स्वतः उत्सुक आहे. इथल्या संस्कृतीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कित्येक मुली आज कथकनृत्य शिक्षण घेताना दिसत आहेत केवळ एक Performing Arts म्हणून या कलेकडे न पाहता, ज्यांना या कलेचा गाभा कळला असेल, ज्यांना ही कला त्यांच्या आयुष्यभराची सोबतीण वाटेल, असे दहा विद्यार्थी जरी तयार झाले तरी मी स्वतःला धन्य समजेन .


दृष्टीपथात माझ्या स्वतःच्या मुलीसह अजून दहा विद्यार्थी आहेत ही त्या नटेश्वराची कृपा !

कथ्थक शिकवता शिकवता …
कथ्थक शिकवता शिकवता …
कथ्थक शिकवता शिकवता …

प्रतिक्रिया
 
On 08/01/2016 05:20 PM sangita wadiya vaidya said:
मनीषा तू मला ओळखतेस का माहित नाही पण तुझ्या बाबाकडे वाचन अंड लेखन साठी मी येत होते मुकुंद देव हा वर्गमित्र असल्याकारणे फ़सेबॊक वर तू दिसलीस अजून तशीच खूप छान दिसतेस आणि परदेशात आपल्या कलेची जोपासना करतेस याचा खूप आनंद वाटला देव तुला तुझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी करो नमस्कार

 
On 08/01/2016 05:20 PM sangita wadiya vaidya said:
मनीषा तू मला ओळखतेस का माहित नाही पण तुझ्या बाबाकडे वाचन अंड लेखन साठी मी येत होते मुकुंद देव हा वर्गमित्र असल्याकारणे फ़सेबॊक वर तू दिसलीस अजून तशीच खूप छान दिसतेस आणि परदेशात आपल्या कलेची जोपासना करतेस याचा खूप आनंद वाटला देव तुला तुझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी करो नमस्कार

 
On 08/01/2016 05:20 PM sangita wadiya vaidya said:
मनीषा तू मला ओळखतेस का माहित नाही पण तुझ्या बाबाकडे वाचन अंड लेखन साठी मी येत होते मुकुंद देव हा वर्गमित्र असल्याकारणे फ़सेबॊक वर तू दिसलीस अजून तशीच खूप छान दिसतेस आणि परदेशात आपल्या कलेची जोपासना करतेस याचा खूप आनंद वाटला देव तुला तुझी सर्व स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी करो नमस्कार

 
On 23/11/2015 11:30 AM Rajiv Moghe .... said:
मनीषा ....अतिशय सुंदर रेखांकन ...परदेशात शिकवताना आलेल्या अडचणी इथल्या पेक्षा एकदम भिन्न ..पण प्रयत्नांची कास न सोडता सातत्याने हा ध्यास चालू ठेवल्या बद्दल तुझे विशेष कौतुक ...हाच ध्यास तुला यशाची नवीन नवीन शिखरे गवसणीत आणण्यास मदत करोत हीच ईश चरणी प्रार्थना ....आणि अर्थात यशस्वी भव हा शुभ आशीर्वाद ....राजीव मोघे ...भारता मधुन ......