Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mahanews
Wednesday, April 18, 2012 AT 08:25 AM (IST)

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्णव्यवस्थेने लादलेली सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय गुलामगिरीविरुध्द बंड पुकारले तो काळ निराळा होता. समाज अशिक्षित व असंघटित होता. अन्याय अत्याचाराविरुध्द लढण्याचे बळ त्यांच्यात नव्हते. अशा अडाण-भोळ्या समाजाला क्रांतीसाठी तयार करणे निश्चितच सोपे नव्हते. या कार्यात शाहिरांच्या आंबेडकरी जलशांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. आंबेडकरी जलशांचे हे प्रबोधनपर्व आजही सुरुच आहे. जुन्या-नव्या आंबेडकरी गीतांच्या जलशांचा कार्यक्रम आजही ग्रामीण भागात समाजोत्थानाचे, शासकीय योजनांना घरोघरी पोहोचविण्याचे कार्य करीत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढयापासून प्रेरणा घेऊन, त्यांचे तत्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांना सांगण्यासाठी समाजातील अनेक शाहिरांनी आंबेडकरी गीतांची निर्मिती केलेली आहे. ही गीते ग्रामीण भागात जलशांच्या माध्यमातून लोकप्रिय केलेली आहेत. जनसामान्यांचे, दीन-दलित वर्गाचे उद्बोधन व समाज परिवर्तनाचा विचार सांगण्याचा उद्देशही या जलशांच्या मागे असल्याचे जाणवते. डॉ. आंबेडकरांचे विचार गावा-गावापर्यंत पोहचविण्याचे, समाजमनात रुजविण्याचे मोलाचे कार्य या आंबेडकरी जलशांच्या माध्यमामधून झाले आहेत. आंबेडकरी चळवळ आणि परिवर्तनवादी विचार हा या आंबेडकरी जलशांचा प्राण आहे.

भारतीय समाजातील माणसामाणसात भेद आणि तोही अमंगल असा निर्माण करणा-या चातुवर्णव्यवस्थेला दुभंगण्याच काम कोणी केलं असेल तर ते केवळ आंबेडकरी जलशांनी. बाबासाहेबांच्या समतावादी विचारांचा प्रसार अवघ्या महाराष्ट्राच्या खेडयापाडयात वसणा-या लाखो अज्ञजनतेपर्यंत पोहचविण्याचं महत्कार्य या जलशांनी केलं. जनजागृती आणि लोकप्रबोधन करुन उच्चनीचतेचा कलंक पुसण्याचं काम खरे तर यामुळेच साध्य झालं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२१ व्या जयंती निमित्‍त या मौलिक कार्याची नोंद साहित्य अभ्यासकांनी आणि प्रसारमाध्यमांनी घेणे गरजेचे वाटते.

तसे पाहिले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आयुष्य म्हणजे एक वादळंच होतं. हे वादळ येण्यापूर्वी चातुर्वर्ण्यव्यवस्थेनं दलितांवर गुलामी लादलेली होती. माणूसपणाचे हक्क, अधिकार तर नाहीच पण जनावरापेक्षाही हीन वागणूक दलितांना दिली जातं होती. डॉ. आंबेडकर नावाचं एक सामाजिक वादळ या महाराष्ट्रात आलं आणि या क्रांतीसूर्याच्या ज्ञानतेजाने अन्याय आणि अत्याचार करणारांची राखरांगोळी झाली. डॉ. आंबेडकरांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात आजही आंबेडकरी जलशांचाव्दारे त्यांचे क्रांतिकारी विचार समाजमनात जागवण्याची कामगिरी पार पाडताना दिसतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदयानंतर आंबेडकरी तत्वज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी फार मोठया प्रमाणात आंबेडकरी गीत लिहिली गेली आणि ती या आंबेडकरी जलशांमधून सादर केली गेली. मनोरंजनापेक्षा उद्बोधनाचा उद्देश त्यामागे अधिक होता. आंबेडकरी तत्वज्ञानाच्या प्रचार प्रसारातील एक प्रमुख माध्यम असलेल्या या जलशांची परंपरा, वेगळेपणा, त्यातील आशय, वैविध्य आणि जलशातील गीतांमधून उभे केलेले आंबेडकरी व्यक्तिमत्व हे शाहिरी गीतातील शब्दांमधून अत्यंत प्रभावीपणे मांडलेले आहे. आंबेडकरी जलशे हे प्रामुख्याने शाहिरांनी सादर केलेले आहेत. 

जलशे सादर करणा-या शाहिरांच्या शाहिरीमधून दलितांच्या दु:खाना आणि वेदनांना वाचा फोडल्याचे दिसते. पारंपारिक पध्दतीने रचना करणारे अनेक दलित शाहीर आंबेडकरपूर्व कालखंडात होऊन गेले. परंतु त्यांच्या शाहिरीत दलितांच्या प्रश्नांना स्थान नव्हते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधकी जलशांतून प्रेरणा घेऊन १८९०-९१ साली कोकणातील गोपाळबाबा वलंगकरांनी खरेतर सर्वप्रथम आंबेडकरी जलशांचा पाया घातला. 

त्यानंतर नागपूर जवळच्या किसन फागु बनसोडे यांनी आंबेडकरी शाहिरी आणि जलशांची परंपरा पुढे नेऊन स्वत:ला या कार्यासाठी वाहून घेतले. त्यानंतर आंबेडकरी जलशांतील शाहिरी भीमराव करडक, केरुजी घेगडे, अर्जुन भालेराव, केरुबुआ गायकवाड, लक्ष्मण केदार रामचंद्र सोनावणे, विठ्ठल उमप आणि लक्ष्मण राजगुरु यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात शाहीरांनी समृध्द केली.

आंबेडकरी जलशांतील शाहीरमधून डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या चळवळींचा, अन्याय-अत्याचारांविरुध्द पेटून उठलेल्या, अंध रुढी आणि श्रध्दा, प्रथा, परंपरा, चालीरीती, बाबासाहेबांच्यानंतर लढल्या गेलेल्या नामांतर लढयाची संघर्ष गाथा, परिवर्तनाच्या प्रवासात दलित समाज आज नेमका कुठे आहे, त्यानं काय कमविले आणि काय गमविले याचा प्रामुख्याने वेध घेतला जातो. त्याचबरोबर भगवान गौतम बुध्द, माँसाहेब रमाबाई आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षि शाहू यांचा जीवनपटही या जलाशामधून अधोरेखित केला जातो.

बाबासाहेबांनी दलितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता यावे यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचाराचा जो निखारा फुलवला त्याला आणखी प्रज्ज्वलीत करण्याचे आणि या ठिणगीचे वनव्यात रुपांतर करण्याचे काम या आंबेडकरी जलशातील शाहिरीमधून झाले आहे. बाबासाहेबांनी घडवून आणलेली क्रांती, चातुर्वर्ण्यव्यवस्थेला झुगारुन देण्यासाठी केलेले धर्मांतर आजही समाजप्रबांधन घडविण्यासाठी प्रेरक आहे. मजल दरमजल करीत, एकेक टप्पा गाठत परिवर्तनाच्या या क्रांतीरथाची वाटचाल व्यवस्थित सुरु ठेवण्याचे कामही या जलशांमुळे होत आहे.

या आंबेडकरी जलशांना आज तब्बल १२० वर्षांचा इतिहास आहे. हजारो वर्षे घट्ट पाय रोवून उभ्या असलेल्या मनुच्या राज्याला ज्या महामानवाने उलथवून टाकले त्या महामानवाच्या स्तुतीसह अनेक समाजप्रबोधनाची काम या जलशांनी केली. रक्तविहीन क्रांतीची लढाई लढलेल्या बाबासाहेबांनी केवळ लेखणी आणि ज्ञानाच्या जोरावर जे कार्य केले तोच कित्ता या जलशांनी गिरवला. विषमतेचा तिरस्कार करुन धर्मांधाच्या चक्रव्यूहाला तोडण्याचे कामही या जलशांनी केले.

आंबेडकरी जलशांमधून आंबेडकरी विचारांच्या प्रचारासह परिवर्तनवादी आंबेडकरी चळवळ दलितांच्या मनात रुजवली. आंबेडकरी जलशे आणि त्यातील शाहिरी ही केवळ पीडक आणि पीडित यांच्यातील व्दंदावरच भाष्य करुन थांबली नाही तर तिने दलितांच्या आजच्या समस्यांनाही वाचा फोडली आहे. सर्वच क्षेत्रातील अन्यायाविरुध्द बंड आणि सामाजिक न्यायाची आग्रही मांडणी हा या जलशांचा आत्मा आहे. 

आंबेडकरी तत्वज्ञानाच्या निरुपणाचे कार्य या जलशांनी ग्रामीण भागातून केले. आंबेडकरवाद हा मानवी मूल्ये आणि बुध्दीवादावरच अवलंबून असल्याचे या जलशांनी वेळोवेळी प्रतिबिंबित केले. धार्मिक, सांस्कृतिक, आथ्रिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात समता प्रस्थापित करण्याची मागणी करतानाच मानवी अवनती आणि अप्रतिष्ठेचे कारण ठरलेल्या अंध रुढी-परंपरा व विकारांवर देखील या जलशांमधून कठोर प्रहार केले गेले. शांततापूर्ण बुध्द धम्मांचा स्वीकार आणि नवसमाजनिर्मितीचा ध्यासही या आंबेडकरी जलशांनी समाजात रुजवला.

अलीकडील काळात कुटुंब नियोजन, दारुबंदी, निर्मलग्राम, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम आणि मुली वाचवा अभियानातील संदेशही जनतेपर्यंत पोहचवला. त्यामुळे आजही हे आंबेडकरी जलशे समाज प्रबोधनात निश्चितच अग्रेसर आहेत यात दुमत नाही.

रुपाली गोरे
सौजन्य - महान्यूज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रतिक्रिया
 
On 26/07/2013 12:01 PM shankar sugaonkar said:
लेख फारच सुरेख आहे. यात आंबेडकरी चळवळ व ही चळवळ जोमाने पुढे नेण्‍यास जलशांचे महत्‍व अधोरेखीत करणारे आहे. परंतु आताच्‍या मनोरंजनाच्‍या दुनीयेत जलशाकरीता श्रोत्‍यांची संख्‍या कमी होत आहे. त्‍यामुळे पुन्‍हा जोमाने जलशांविषयी जनमानणासात आकर्षण निर्माण होण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे असे वाटते

 
On 20/04/2012 01:57 PM vijay w kamble said:
blog khup bodhper aahe

 
On 19/04/2012 11:41 PM sv said:
I respect Dr. Ambedkar for his abilities but feel he did not give enough consideration for 'Indian way of thinking' by not adding sufficient checks and balances in the constitution. By expressing this, I am not blaming but respecting him for trust he had shown towards fellow Indians. As we know later generation have shown their true colors he had not thought about.

 
On 19/04/2012 03:39 PM sandeep said:
मी आंबेडकरांना मानाचा मुजरा करतो . पण त्यांच्या नावाखाली जो हा घाणेरडा राजकारणाचा खेळ खेळतात हे पुढारी पांढरपेशी औलाद आपल्याच जातीतील लोकांना पायदळी तुडवायला लागलेत . आठवलेंना पाहून आठवले कि आठवले कि त्यांना कोणत्या हि पक्ष्यात थारा मिळाला नाही . आपली अवस्था अगदी गाढवासारखी करून घेतली . ना घर के रहे ना घाट के बिचारे .