Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गानसम्राज्ञी आणि तिचे संगीतकार..

Loksatta
Friday, March 30, 2012 AT 07:34 PM (IST)
लता मंगेशकर या नावाला एका जिवंत दंतकथेचं वलय लाभलं, त्याला अनेक र्वष लोटली तरी हे वलय अद्याप कायम आहे. प्रामुख्याने गेल्या शतकातला काळ गाजवलेल्या या श्रेष्ठ गायिकेविषयीचं कतूहल आणि तिच्या गाण्यांबद्दल रसिकांमध्ये असलेली असोशी या साऱ्या गोष्टी एकविसाव्या शतकाचं एक तप उलटायला आलं तरी जशाच्या तशा कायम आहेत. म्हणूनच लता मंगेशकर यांच्यावर प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची संख्यादेखील तेवढीच मोठी आहे.

विशेषत: गेल्या पंधरा-वीस वर्षांमध्ये अशा पुस्तकांची संख्या वाढल्याचं दिसून येतं. केवळ इंग्रजीतून प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांचा उल्लेख करायचा झाल्यास हरीश भिमाणी या प्रख्यात निवेदकानं भक्तिभावनेनं लिहिलेलं ‘इन सर्च ऑफ लता’ हे चरित्र, राजू भारतन या जाणत्या संगीत समीक्षकानं पल्लेदार इंग्रजीत (काही वादग्रस्त विधानांसह) लिहिलेलं ‘लता मंगेशकर : अ बायोग्राफी’, वा खुद्द लताच्या प्रदीर्घ मुलाखतीवर आधारित नसरीन मुन्नी कबीर या लघुपटनिर्मातीनं शब्दबद्ध केलेलं ‘लता इन हर ओन व्हॉईस’ ही काही उल्लेखनीय नावं. ‘लता : व्हॉईस ऑफ द गोल्डन इरा’ हे डॉ. मंदार बिच्चू यांचं देखणं पुस्तक अशा दखल घेण्याजोग्या प्रकारातलं आहे, ही लताप्रेमींना दिलासा देणारी बाब ठरावी. मूळचे मुंबईकर आणि पेशानं डॉक्टर असलेले बिच्चू हे गेल्या काही वर्षांपासून शारजा येथे स्थायिक झाले आहेत. लताच्या गाण्यांचा निस्सीम भक्त आणि एकूणातच चित्रपटगीतांचा जाणकार श्रोता असलेल्या या लेखकाचं ‘गाये लता गाये लता’ हे मराठी पुस्तक १९९६ मध्ये प्रसिद्ध झालं होतं. प्रस्तुत इंग्रजी ग्रंथ हे त्याचंच विस्तारित आणि अधिक आकर्षक रुपडं ठरावं. हार्ड बाऊंड, संपूर्ण आर्ट पेपरवरील चकचकीत छपाई, शंभरहून अधिक दुर्मीळ छायाचित्रं, त्यांची वेधक मांडणी अशा ‘कॉफी टेबल बुक’ प्रकारातल्या या तगडय़ा ग्रंथराजानं (वजन पावणेतीन किलो!) दिवाणखान्याची शोभा वाढण्याबरोबरच वाचनाची भूकही भागते हे महत्त्वाचं.

लेखकानंच म्हटल्याप्रमाणे हे लताचं चरित्र नसून तिच्या कारकीर्दीचा (त्यातही, हिंदूी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातल्या कामगिरीचा) आस्वादक भूमिकेतून घेतलेला आढावा आहे. एकदा रूढ अर्थानं चरित्र लिहायचं नाही हे ठरवल्यानंतर लेखकानं त्याला सोयीचा (आणि सर्वसामान्य रसिकांना आवडणारा) मार्ग या लेखनासाठी निवडलाय, तो म्हणजे १९४५ ते १९७५ या काळातील प्रमुख संगीतकारांची कारकीर्द लताच्या स्वरानं कसकशी बहरत गेली याचा विस्तृतपणे घेतलेला आढावा.  

आरंभी लेखकानं बालपणी स्वत:ला झालेला लताच्या अनोख्या स्वराचा परिचय आणि पुढल्या काळात याच स्वराचा ‘पल्लू’ धरून केलेली संगीतविश्वाची मुशाफिरी यांचं वर्णन केलंय. ‘आएगा आनेवाला..’ या गाण्यानं लतायुग अवतरल्याची द्वाही कशी दिली त्याचा इतिहास एका स्वतंत्र लेखाद्वारे मांडलाय. त्यानंतर येतो लता आणि तिचे संगीतकार हा महत्त्वपूर्ण विभाग. हिंदी चित्रपटसंगीतावर ठसा दीर्घकाळ ठसा उमटविणाऱ्या तब्बल सोळा संगीतकारांवरील लेखांचा या विभागात समावेश असून हे सर्वच लेख मुळातून वाचण्याजोगे आहेत. या संगीतकाराच्या कारकीर्दीत लताचं गाणं कसं बहरत गेलं हे एवढय़ा विस्तारानं विशद केलंय की ते त्या त्या संगीतकारावरील स्वतंत्र लेखच वाटावेत. उदाहरण द्यायचं झाल्यास नौशादवरील लेखात केवळ त्यांच्यासाठी लतानं गायलेल्या गाण्यांचं रसग्रहण येतंच, पण काळानुसार नौशाद यांच्या संगीतात कसा बदल होत गेला तेही निरीक्षण लेखक नोंदवतो. शंकर जयकिशन या सर्वाधिक लोकप्रिय जोडीच्या संगीतात लताचं स्थान किती महत्वाचं होतं हे सोदाहरण पटवून देताना १९६० नंतरच्या कालखंडात या जोडीच्या संगीतातून लताचं गाणं कसं कमीकमी होत गेलं, लताचा या जोडीशी बेबनाव कोणत्या कारणांनी झाला याचाही आढावा लेखकानं घेतलाय. लता आणि सी. रामचंद्र या जोडीवर अलीकडे अभावानंच लिहिलं जातं. लेखकानं ती उणीवही भरून काढलीय. अनिल विश्वास यांच्या ‘हमदर्द’मधील ‘ऋतु आए ऋतु जाए सखी री’ या रागमालेच्या तोडीचं दुसरं क्लासिकल गाणं झालं नाही, या लेखकानं नमूद केलेल्या मन्ना डे यांच्या मताशी कुणीही रसिक सहमत होईल. अर्थात, अनिल विश्वास म्हणजे केवळ रागदारीवर आधारित संगीत नव्हे. गोडवा आणि कारुण्य हाच स्थायीभाव असलेल्या, अनिलदांच्या संगीताचा इथं लेखकानं समर्थपणे वेध घेतलाय. एस. डी. बर्मन, मदन मोहन, रोशन, हेमंत कुमार, सलील चौधरी, वसंत देसाई, जयदेव, खय्याम आर. डी. बर्मन, लक्ष्मी-प्यारे, कल्याणजी आनंदजी आणि हृदयनाथ मंगेशकर एवढय़ा संगीतकारांच्या लतागीतांचा विस्तृत आढावा लेखकानं घेतलाय. सुवर्णयुगोत्तर संगीतकारांच्या कारकीर्दीतल्या लतागीतांवर दोन स्वतंत्र लेख अंतर्भूत आहेत. 

आघाडीचे संगीतकार ओ. पी. नय्यर यांच्यासाठी लतानं एकही गाणं गायलं नसल्यानं त्यांच्यावरील लेख असण्याचा प्रश्न येत नाही. पण ती उणीव लता नय्यरसाठी का गायली नाही, या छोटय़ाशा लेखातून मिळते. लता आणि नूरजहाँ यांच्यात श्रेष्ठ कोण? आपला काळ संपल्यानंतरही लतानं गाणं सुरू ठेवणं कितपत योग्य? अशा वादग्रस्त मुद्दय़ांची चर्चा इथं केलीय. या जोडीला अमीन सयानी यांनी घेतलेली लताची एक मुलाखतही इथं देण्यात आलीय.

नूतन आसगावकर यांनी केलेली ग्रंथाची सजावट ‘पडद्याला टाळी’ या दर्जाची.  देखणेपण लाभलेल्या या ग्रंथात तपशीलाच्या काही चुका नसत्या तर योग्य ठरलं असतं. संगीतकार कमल मित्रांचा उल्लेख बिमल मित्रा होणं वा शंकर जयकिशनच्या ‘संन्यासी’ या चित्रपटाचं वर्ष १९७५ ऐवजी १९७३ असं छापलं जाणं या चुका मुद्रणदोष म्हणून एकवेळ क्षम्य ठरतील, पण ‘अनारकली’मध्ये ‘दुआ कर ग़म-ए-दिल’ हे शैलेंद्रचं ‘एकमेव’ गाणं असल्याचा उल्लेख करताना त्याच चित्रपटात ‘आजा आब तो आजा’ हे शैलेंद्रचं आणखी एक गाणं होतं, याचा विसर लेखकाला कसा पडला? बर्मनदांनी दिलेलं ‘शीशे का हो कि पत्थर का दिल’ हे ‘बात एक रात की’ मधलं गाणं ‘डॉ. विद्या’मधलं असल्याचा उल्लेख वा हेमंत कुमारवरील लेखात ‘बिन बादल बरसात’मधल्या ‘एक बार जरा फिर कह दो’ या गाण्याच्या जागी ‘सहेली’मधल्या भलत्याच संगीतकाराच्या गाण्याचा उल्लेख करणं यासारख्या काही चुका रसहानी करतात. सध्याचे आघाडीचे गायक शंकर महादेवन यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभलीय. लताच्या चाहत्यांनाच नव्हे, तर हिंदी चित्रपटसंगीतावर प्रेम करणाऱ्यांना रुचेल असा हा ग्रंथ आहे. 

सुनील देशपांडे 


गानसम्राज्ञी आणि तिचे संगीतकार..

प्रतिक्रिया
 
On 09/10/2015 11:04 PM ram padhye said:
सज्जाद हुसेन , श्यामसुंदर , विनोद, हंसराज बेहेल , शार्दुल कवात्रा , हुस्नलाल भगतराम ह्यांच्याबद्दल काहीच लिहिले नसेल तर पुस्तक अपूर्ण ठरेल असे वाटते. ह्या लोकांसाठी किती पाने दिली आहेत? ,