Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
विठ्ठलाचे आख्यान सुफल संपूर्ण
Mahanews
Monday, November 29, 2010 AT 06:33 PM (IST)लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे नागपूरच्या दीक्षाभूमीवर दिनांक २६ नोव्हेंबर २०१० रोजी जय भिम, जय बुध्द अषी गर्जना करतांना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता येताच संपूर्ण महाराश्ट्रातील शाहीर उमपांचा रसिकवर्ग शोकसागरात बुडाला. लोकशाहीर विठ्ठल उपम यांचे संपूर्ण नाव विठ्ठल गंगाराम उमप. १५-०७-१९३१ ही त्यांची जन्मतारीख. वयाच्या आठव्या वर्षापासून विठ्ठल उमप यांनी गायनाला सुरूवात केली. वयाच्या ८० वर्षापर्यंत म्हणजेच शेवटच्या श्वासापर्यंत ते गात राहीले. १९६० पासून रूढ अर्थाने शाहीर म्हणून ते सर्वपरिचित झाले. गायन आणि अभिनय या दोन्ही कलांमध्ये उमप हे निष्णात असून पोवाडा, लावणी, कोळीगीते, लग्नगीते, जागरण-गोंधळासारखी विधिगीते, भारूडे, कव्वाली, जानपद गीते, अभंग असे विविध प्रकारचे गायन विठ्ठल उमप यांनी केले. एक बहुआयामी लोकरंगनायक असे त्यांचे वर्णन करता येईल.

शाहीरीचे पारंपरिक व्यासपीठ, लोकनाट्य, नाटकाची व्यावसायिक रंगभूमी, दूरचित्रवाणीचा छोटा पडदा, त्यावरील मालिका, रूपेरी पडदा अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये विठ्ठल उमप यांचा मुक्त संचार होता, एक गायक आणि एक अभिनेता म्हणूनही! त्यांची हजारच्यावर गीते ध्वनिमुद्रित झालेली आहेत. जवळजवळ ४५ वर्शे त्यांनी आकाशवाणीवरून गायन केले. ३० वर्षे कामगार कल्याण मंडळाचे तसेच दारूबंदी आणि कुष्ठरोग निर्मूलनाचे जनजागृतीपर कार्यक्रम केले. एचएमव्ही, व्हीनस, टी सिरीज, स्वरानंद आदी कंपन्यांनी त्यांच्या गीतांच्या कॅसेटस् काढल्या आहेत.

'फू बाई फू फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू!` हे भारूड, 'दादा आवरये` हे कोळीगीत, 'बाजीराव नाना आता बाजीराव नाना, तुंबडीभर देना` हे तुंबडीगीत, त्यांच्या गात्या गळय़ातून जेव्हा अवतरतं होतं तेव्हा महाराश्ट्रातले तमाम रसिकजन डोलू लागत. अबकदुबक, खंडोबाचं लगीन, मातीचं स्वप्न, अरेरे संसार, जांभूळाख्यान, मुजरा घ्या सरकार, गाढवाचं लग्न, दार उघड बया दार, विठू रखुमाई आदी नाटकांमधून त्यांनी अभिनय आणि गायनाचं समर्थ दर्षन घडविलं. आहेर, पायगुण, अन्यायाचा प्रतिकार, भीमगर्जना, अष्व (हिंदी), सौभाग्य कंकण, जन्मठेप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, टिंग्या, गलगले निघाले, कच्चा लिंबू यासारख्या चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत.

होळी, तांडा, भारत एक खोज, महापर्व, सागर की गोद में, या दूरदर्शन मालिकांमधून पार्श्वगायन केले आहे. प्रतिभा आणि प्रतिमा, ज्ञानदीप, आमची माती आमची माणसं, ई टीव्हीवरील संवाद तर झी मराठीवरील वस्त्रहरण या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. याशिवाय उमाळा हा गजल संग्रह, गीत पुष्पांजली, माझी वाणी भीमाचरणी, माझी आई भीमाई, रंग शाहीरीचे (शाहीरी गीते) हे गीत संग्रह प्रकाशित झाले आहेत. १९८३ साली कॉर्क आयर्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय लोकसंगीत, लोकनृत्य महोत्सवात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक भारताला मिळवून दिले.१९६९ साली इंदिरा गांधींच्या उपस्थितीत मागासवर्गीयांच्या मागण्या हिंदी भाशेतून सादर केल्या.

इंडियन नॅशनल थिएटर लोककला संशोधन केंद्र या संस्थेचे उद्घाटन ऑक्टोंबर १९७८ साली दादू इंदुरीकर यांच्या हस्ते झाले आणि या संस्थेच्या विविध नाटकांमध्ये काम करण्याची संधी आयएनटीचे तत्कालीन संचालक नाटककार अशोकजी परांजपे यांच्यामुळे उमप यांना प्राप्त झाली. आपल्या गायनाचा आणि अभिनयाचा स्वतंत्र असा ठसा त्यांनी आय.एन.टी. च्या नाटकात उमटवला होता. त्यानंतर रत्नाकर मतकरी यांच्या विठोरखुमाय या नाटकात उमपांचे धनगर गीतांचे वेगळे रूप दिसले. 'चारा खाई कुरकुरू, चालत्यात तुरूतुरू, ही आमची पांढरं, रान माळावरती राखितो मेंढरं` हे खंडोबाचे लगीनमधील धनगरीगीत गाताना उमप असे नाचायचे जणू ते मोकळया रानमाळावर मेंढरांसोबत आहेत. जांभूळ आख्यानमधील 'राधाविलास` ही गवळण सादर करताना ते राधेच्या वात्सल्य आणि श्रृंगार या दोन्हीही भावना एका क्षणात उभे करायचे. जांभुळ आख्यानामधील त्यांनी उभी केलेली द्रौपदी हे त्यांच्या समर्थ अभिनय शैलीचे एक उदारण होय.

उमप यांना कलेच्या क्षेत्रातील कुठलेही कुंपंण मान्य नव्हते. ते कुंपंणाबाहेरील बहुआयामी कलावंत होते. आंबेडकरी जलशातील एखाद्या परिवर्तन गीतात ते जितके रमले तितकेच अंबेच्या गोंधळात रंगून गेले. रंगभूमीवरील एखाद्या नाटकात जितके रमले तितकेच दूरचित्रवाणीच्या छोटया पडद्यावर अथवा रूपेरी पडद्यावर त्यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने दर्शन घडविले. टिंग्या, विहीर, पारधसारखे चित्रपट असो अथवा भंडारभूलसारखी मालिका असो उमप यांच्या अभिनयाचे दर्शन मनोरंजनांच्या विविध माध्यमांमधून घडले. भास्कर, नंदेष, संदेष, उदेष या आपल्या पुत्रांसोबत 'मी मराठी` हा लोककलांना वाहिलेला कार्यक्रम त्यांनी रंगभूमीवर आणला आणि इतिहास घडवला. गेल्या महिन्यातच त्यांना भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते.या थोर लोकशाहीरांच्या कलाक्षेत्रात आठवणी महाराष्ट्रतील लाखो रसिकांच्या मनात सतत रूंजी घालतील. आज या विठ्ठलाचे आख्यान सूफल संपूर्ण.

- डॉ.प्रकाश खांडगे

प्रतिक्रिया
 
On 31/01/2013 05:13 PM arun kamble said:
कलाकाराचे मरण असावे ते असे .आपणास धन्यवाद.