Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली
GlobalMarathi
Friday, November 12, 2010 AT 12:00 AM (IST)

डॉ सलिम अली (सलिम मोईझुद्दीन अली- जन्म १२ नोव्हेंबर १८९६- म्रुत्यु- २७ जुलै १९८७) भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ होते तसेच भारताचे आद्य पर्यावरणवादी होते.
सलिम अली यांनी ब्रिटिश राजमधील काळात भारतातील पक्ष्यांचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला. पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, विविध प्रकारच्या जाती, जातींमधील विविधता यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षीनिरिक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील पक्षी निरिक्षक सलिम अली यांना आद्य गुरु मानतात.


आपल्या आत्मचरित्रात डॉ. अली आपण पक्षीनिरिक्षणास कसे वळलो याचे वर्णन करतात. जुन्या मुंबईच्या खेतवाडी मध्ये मुस्लिम कुटुंबात अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छ-याच्या बंदूकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या
चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमी पेक्षा वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता याची विचारणी केली. मामांनी सरळ त्याला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकाकडे घेउन गेले. तेथे संचालकांनी लहान अलीला हा कोणता पक्षी आहे हे सविस्तर सांगितले. तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारावलेल्या लहान सलिम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच.

यानंतरच्या काळात सलिम अलींचा पक्षिछंद त्यांची टिपणे व नोंदी करणे यात मर्यादीत राहिला. शालेय शिक्षणानंतर त्यांना प्राणी शास्त्रात पदवी घ्यायची होती परंतु शास्त्रातील अनेक अवघड विषयांमुळे माघार घ्यावी लागली. दरम्यान ते ब्रम्हदेशातील आपल्या बंधूंच्या धंद्याला मदत म्हणून रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत ब्रम्हदेशातील जंगले फिरुन पक्ष्यांना टिपून नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. १९१८ मध्ये त्यांचा तेहमिना यांच्यांशी विवाह झाला.

एका यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो ही म्हण सलिम अलींच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. १९२४ मध्ये रंगून मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले. दरम्यान तेहमिना यांनी सलिम अलींचा पक्ष्यांबद्दलचा कल जाणून घेतला होता व त्यांना अशी नोकरी करण्यास प्रोत्साहन दिले ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल. परंतु सलिम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीमध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात पक्षीशास्त्र (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षीशास्त्रावर प्रशिक्षण घेतले व काही काळ इंग्लंडमध्ये काम केले.

भारतात आल्यानंतर या विषयात नोकरी मिळणे कठीण काम होते. सलीम अली अजूनही हौशी पक्षी निरिक्षकांमध्येच गणले जात. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अलिबागजवळ किहीम येथे आपला मुक्काम हलवला. या मुक्कामात त्यांनी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर बीनएचएस च्या जर्नलमध्ये प्रदीर्घ शोधनिबंध लिहीला. या निंबधाने त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून दिला. तसेच केवळ टिपून भुसा भरुन संग्रहालयात ठेवण्यापुरते पक्षीशास्त्र नाही हे त्यांनी जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षीशास्त्राला वेगळी दिशा दिली.

या नंतर १९३० च्या सुरुवातीला सलीम अलींना ब्रिटीश सरकार तसेच संस्थाने पुरस्कृत पक्षी मोहिमांवर बोलवणे येऊ लागली. अलींनी या मोहिमांवर आपण नोंदी तसेच पक्ष्यांचा जीवनशैलींवर अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले, केवळ पक्षी टिपून नोंदी ठेवण्यात आपल्याला रस नाही ते काम कोणीही स्थानिक कामगार करु शकेल असे स्पष्ट केले.

आता अली सर्वमान्य पक्षी शास्त्रज्ञ झाल्यामुळे तत्कालिन ब्रिटिश अधिका-यांनी मंजूरी दिली व सलीम अलींचे खरेखुरे पक्ष्यांचे काम सुरु झाले. या नंतरच्या काळात भारताच्या मोठ्या भूभागावर त्यांनी पक्षी निरिक्षण मोहिमा आखल्या. वायव्य सरहद्दीपासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलदली पासून पुर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. त्यांचे वर्तन, हवामानानुसार होणारे त्यांचे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली.

सुरुवातीला या कामी त्यांची पत्नी तेहमीनाने खूप मदत केली. त्याच सलीम अलींच्या मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत. १९३९ मध्ये तेहमिनांचा मृत्यु झाल्यानंतर अली खुपच व्यथित झाले व त्यांच्या आयुष्यात खुप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यातून सावरुन पुन्हा लग्न न करता त्यांनी आपले आयुष्य संपूर्णपणे पक्ष्यांना वाहून देण्याचे ठरवले. आपला मुक्काम मुंबईला बहिणीच्या घरी हलवला व तेथूनच आपले उर्वरित आयुष्य घालवून भारतीय पक्षीशास्त्रासाठी अजरामर ठेवा निर्माण केला.

सलीम अलींचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मोठेपण कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके. भारतभर फिरुन त्यांनी जी तपशीलवार माहिती गोळा केली होती, त्यांचे त्यांनी केवळ रेकॉर्डसमध्ये स्थान न ठेवता ती माहिती सर्व सामान्यांना वापरता येईल अश्या शैलित पुस्तके लिहिली.

सुरुवातीच्या काळात त्यांचे लिखाण सुधारण्यातही त्यांना तेहमिनांनी मदत केली. १९४३ मध्ये लिहिलेले द बुक ऑफ इंडियन बर्डस हे आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचे आहे. आज हे पुस्तक १३व्या आवृतीत असून पुस्तकातील मुख्यत्वे पक्ष्यांची चित्रे बदलण्यात आली आहेत. या वरुन त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरिक्षणांची अचूकता लक्षात येते.

त्यांनी लिहीलेल्या हँडबुक ऑफ इंडिया अँन्ड पाकिस्तान व पिक्टोरियल गाईड या दहा खंडीय पुस्तकाने त्यांना खर्‍या अर्थाने अजरामर केले. डॉ सिडने डिलन रिप्ली यांच्या साथीत त्यांनी अपार परिश्रम घेउन भारतीय पक्ष्यांच्या १२०० जाती, २१०० उपजातींच्या नोंदी, सवयी, शास्त्रशुद्ध सर्वांगीण माहिती चित्रांसहीत एकाच ठिकाणी उपलब्ध केली.

१९५० व ६० च्या दशकात जेव्हा भारतात पर्यावरण हा शब्द अस्तित्वातच नव्हता त्यावेळेस भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान तसेच केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात तत्कालिन होणारे पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना विरोध दर्शावला. त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेऊन इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले. तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देऊन कायमचे संरक्षित केले. तसेच अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारे, शिष्यांमार्फत सरकार तसेच सामान्य नागरिकात केलेले प्रबोधन भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ अली यांचा समावेश होतो.

डॉ. सलीम अली यांना वेगवेगळया पुरस्कारांनी विभूषित करण्यात आले.
- पद्मभूषण (१९५८)
- ब्रिटीश पक्षीतज्ज्ञ संघाचे (British Ornithologists Union) राष्ट्रीय पदक (१९६७)
- The John C. Phillips Medal for Distinguished Service in International Conservation, from the World Conservation Union (1969)
- पद्मविभूषण (१९७६)
- ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क हॉलंड सरकार(१९८६).
प्रतिक्रिया
 
On 26-08-2015 06:04 ?.??. विजय गायकवाड said:
लेख प्रचंड आवडला. सलीम अली यांचेविषयी आणखी जाणून घ्यायला आवडेल.

 
On 11/11/2013 04:01 AM Ram Kankudkewad said:
सलीम आली हे एक पक्षी तज्ञ होते. ते एकदा असेच जंगलातून जात होते तेन्ह्वा त्यांना खडकावर फुले उम्लाल्याली दिसली त्याच्या लक्षात आले कि या फुलांना कसलाही वास किंवा नाव नाही . मग त्यांनी खडक पुष्प नाव ठेवले

 
On 26/03/2012 02:17 PM sujay phadke said:
हा लेख मला खूप आवडला. माझ्या मेल आयडी वर अधिक माहिती पाहिजे sujayphadke23@gmail.com

 
On 11/11/2013 04:04 AM Ram Nagorao Kankudkewad said:
मला सलीम आली विषयी माझ्या ईमेल आयडीवर मला जास्तीत जास्त माहिती पाहिजे .